परभणी: काठ तू, पाण्याची लाट मी, मनाच्या सागरी कुठली दरी आहे, अरे मी तुझा, तू माझा खांदेकरी आहे…..प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे ( ठाणे ) यांनी अशा एकाहून एक सादर केलेल्या भीमगीत, काव्य गायन सादरीकरणाने येथील वांगी रोड हडको परिसरातील विकास भारती प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती, बौद्ध पोर्णिमा,कामगार दिनाच्या निमित्ताने शुक्रवार ( दि. १ ) मे रोजी आयोजित ‘भीम पर्व…. अभिवादन !… बा भीमा ‘ उपक्रम उत्साहात साजरा झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भीमराव खाडे हे होते. तर मंचावर कृषीभूषण कांतराव झरीकर, इंजिनिअर नारायण चौधरी, केशव अण्णा दुधाटे, शेतकरी संघटनेचे शेख जाफर तरोडेकर, डिघोळे, दि.फ.लोंढे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले, डॉ.सुरेश शेळके, कवी यशवंत मकरंद, कवी डॉ. सुरेश हिवाळे, कथाकार बबनराव आव्हाड, राजेंद्र गहाळ, मुख्याध्यापक अविनाश मालसमिंदर, नितीन देशमुख, बालाजी मोहिते, डॉ. सुनील धापसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरूण चव्हाळ,बाळू बुधवंत, नवनाथ जाधव, मुख्याध्यापक हरि पंडित तिडके, हर्षवर्धन भालेराव,मुक्ता दुधाटे, संदीप काळे, पंकज खेडेकर,विश्वजीत वाघमारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक गोपाळराव भूसारे यांनी केले.
युवकांनी विधायक उपक्रमासाठी पुढे यावे
– डॉ. भीमराव खाडे
भीम पर्व हा उपक्रम युवकांना महापुरुषांच्या विचारानुसार वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा आहे. शिक्षणातूनच सर्वांचा उत्कर्ष होतो. एक चारित्र्यसंपन्न, व्यसनमुक्त युवकच सशक्त राष्ट्राचे निर्माण करतो. यासाठी महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीला कळणे गरजेचे असते. ही प्रेरणा जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमातूनच भावी पिढीला मिळते. त्यामुळे युवकांनी विधायक उपक्रमासाठी पुढे यावे. असे प्रतिपादन भीम पर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भीमराव खाडे यांनी केले.
भीम पर्व उपक्रम माणूस जोडणारा
– प्रशांत मोरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांनी समतेची शिकवण दिली. माणसाकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे. सर्वांनी माणूस म्हणून जगले पाहिजे हे सांगितले. भीम पर्व उपक्रम माणूस जोडणारा आहे. विकास भारती प्राथमिक शाळेतून घडणारे विद्यार्थी महापुरुषांच्या विचारांचा ज्ञानप्रकाश सर्वदूर पोहचवून महापुरुषांच्या स्वप्नातील राष्ट्र घडवतील. असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे (ठाणे) यांनी केले.