मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत सेलू येथे बैठक संपन्न

सेलू , दि. 11 (प्रतिनिधी ) : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 च्या अनुषंगाने सेलू येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, राजकीय पक्ष तालुका प्रमुख, नोंदणीकृत व अनोंदणीकृत व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत दि. 20 जून ते 29 जून 2026 या कालावधीत तयारी, प्रशिक्षण तसेच इन्यूमेरेशन फॉर्म डाउनलोड व छपाईचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दि. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरभेटीद्वारे मतदारांची माहिती संकलित करून इन्यूमेरेशन फॉर्म भरून घेणार आहेत.
दि. 29 जुलै, 2026 रोजी पर्यंत ज्या मतदान केंद्रांवर सुमारे 1200 मतदार आहेत, त्या केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन दि. 05 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात येणार असून, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 05 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर 2026 असा राहणार आहे. प्राप्त दावे व हरकतींवर संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी सुनावणी घेऊन आवश्यक पडताळणी करून निर्णय देणार आहेत. अंतिम मतदार यादी दि. 07 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तसेच सर्व पोलीस पाटील यांनी संबंधित गावातील बीएलओ यांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन, जनगणना, गौण खनिज कायद्याची अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था यासंदर्भातही सूचना देण्यात आल्या. नियुक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दि. 20 जून 2026 पासून त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले एसआसआर संदर्भातील कामकाज विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.



