आपला जिल्हा

सांगा कुणाचा डाव, मला शेती विकायची राव मिरगाच्या ओव्या, कवितांनी जिंकली रसिकांची मने

सेलू : ( प्रतिनिधी ) ” कापुस गेलाय बाराच्या भावात,उसाला नाही हो भाव ,हरभरा गेलाय कमी दराने,सांगा कुणाचा डाव,मला शेती विकायची राव… ” या कवितेतून शेतकऱ्यांची वेदना, जीवनाचे दाहक वास्तव कवी राजकुमार नायक यांनी मांडले. तर डॉ.सखाराम डाखोरे यांनी सादर केलेल्या ‘ मिरगाच्या ओव्यांनी…. ‘, कवितांनी रसिकांची मने जिंकली. शहरातील नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब.गिल्डा सभागृहात रविवार ( दि.०७) रोजी ‘ कविता मिरगाच्या’ महाराष्ट्रातील नामवंत कवींची बहारदार मैफल काव्य रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर हे होते. तर काव्यमंचार नगराध्यक्ष मिलिंद सावंत, शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव लहाने, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर, शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे ( वाशिम ), कथाकार राम निकम यांची उपस्थिती होती. शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कविता मिरगाच्या’ या कवी संमेलनात १३ व्या वर्षी निमंत्रित कवी युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी डॉ.विरा राठोड ( कन्नड), डॉ.सखाराम डाखोरे (मुंबई), डॉ.ऊर्मिला चाकूरकर ( पैठण), राजकुमार नायक ( हिंगोली), प्रेमानंद शिंदे (वसमत) यांचा सहभाग होता. कवींनी एकाहून एक सरस रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कवी संमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन कवी डॉ. अशोक पाठक ( सेलू ) यांनी केले.

डॉ. सखाराम डाखोरे यांनी “लढला माझा ज्योतिबा रं, लढला माझा भीमा,बिरसाचा तो उलगुलान
कधी घडेल पुन्हा..?,जातीच्या पल्याड माणूस, जात कसा नाय?, कळला नाही माणसांचा, कसा झाला रे बोन्साय…” महापुरुषांनी समतेसाठी लढा दिला. पण माणूस अजूनही जात सोडायला तयार नाही. जातीवादाचे भिषण वास्तव त्यांनी आपल्या कवितेतून मांडले. तर डॉ.ऊर्मिला चाकूरकर यांची, “दाटले मनात मघ, नाचतो दुःख मोर, दुःख निळे घमसान, बेधुंद स्वरविभोर ” ही कविता रसिकांना भावली. प्रेमानंद शिंदे यांनी आईवरील ‘बाईस….’ या कवितेतून थेट काळजाला हात घातला. त्यांनी ‘ दगड’,’ भाकर’ आणि ‘ आज भीतीच तर आहे पसरलेली सर्वदूर,आत बाहेर जिथे तिथे, घराच्या भिंती देखील राहिल्या नाहीत सूरक्षीत…’ ही ‘भीती’ नावाची कविता सादर करून काव्य रसिकांना अंतर्मुख केले.तर डॉ. वि.रा. राठोड यांनी सादर केलेल्या ‘ तरीही आम्ही पावसाची वाट बघायचो ‘, ‘ आभाळाला हात देता येत नाही’,’ संजीवक गाणे ‘,’ बिगूलबाजा’ या कवितांना रसिकांनी दाद दिली. शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सुरेश हिवाळे यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन सुभाष मोहकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्षर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शरद ठाकर, उपाध्यक्ष डॉ. सतीश मगर, रमेश नखाते, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, बाळू बुधवंत, संतोष ताल्डे, अरूण रामपूरकर, गोविंद रामपूरक यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, कवी केशव खटींग यांच्यासह परभणी, परतूर, मंठा, जिंतूर, वसमत येथील श्रोते माठ्या संख्येने उपस्थित होते.

*कार्यक्रमात मान्यवरांचा सन्मान*

शहरातील सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, ज्येष्ठ कथाकार राम निकम, सर्जेराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार दिलीप डासाळकर, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, कथाकार बबन आव्हाड, अरूणा थोरे, माधव गव्हाणे या मान्यवरांचा शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

 

सेलू: येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘ कविता मिरगाच्या’ कवी संमेलनात सहभागी कवी विरा राठोड, सखाराम डाखोरे, ऊर्मिला चाकूरकर, राजकुमार नायक, प्रेमानंद शिंदे, अशोक पाठक.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!