सेलू (प्रतिनिधी ) सेलू येथे एमआयडीसी उभारणीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांना गुरुरवार दि 04 जून रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
सेलू तालुक्यातील रवळगाव, हदगाव खु, पिंप्रूळा, वाकी शिवारातील शेत जमीन संपादित करण्याचे काम सुरू होते परंतु मध्यंतरी ही प्रक्रिया थांबविण्यात आल्याने पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. सेलू शहर जवळपास एक लाख लोकसंख्या असणारे शहर असून येथे लोअर दुधना प्रकल्पामुळे परिसरातील विस्थापित झालेली गावे सेलू शहरालगत वसलेली आहेत. त्या सर्व विस्थापितांना या ठिकाणी एमआयडीसी झाल्याने रोजगार उपलब्ध होऊ शकतो व हाताला काम मिळू शकते.
सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पामुळे तसेच 132 केव्ही उपकेंद्रामुळे एमआयडीसी प्रकल्पातील उद्योगांना वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते त्याचबरोबर सेलू तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गामुळे दळण वळण सुलभ होऊ शकते. तरी आपण पुढाकार घेऊन सेलू तालुक्यात एमआयडीसी मंजूरी द्यावी अशी मागणी उद्योग मंत्री माननीय उदय सामंत यांना सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषद सदस्य संजय साडेगावकर, सेलूचे नगरसेवक मनीष कदम, सुबोध काकडे, प्रसाद खारकर यांच्या वतीने करण्यात आली.