सेलू ( प्रतिनिधी ) माणसे ज्याचे ध्यान करतात त्याचे गुण माणसात येतात. त्यामुळे जीवन उद्धारक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करावे. शुद्ध क्रीया, कृती, शब्द, विचार, ध्वनीने मंगलाचरण घडते. संकल्प शक्तीशाली असेल तरच तो सिध्दीस जातो. आपल्या ह्रदयातील ईश्वराचा साक्षात्कार करून देणे हे भागवताचे प्रयोजन आहे. श्रीमद् भागवत जीवन समृद्ध करणारा ग्रंथ आहे. असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले.
कुलकर्णी परिवाराच्या वतीने पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाचे पहिले पुष्प पद्मनाभ महाराज व्यास यांनी शनिवार ( दि.१३ ) रोजी शहरातील ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात गुंफले. पुढे बोलताना पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की,” वेदरूपी कल्पतरूला लागलेले रसस्वरूप फळ म्हणजे श्रीमद् भागवत. हा ग्रंथ सर्वांसाठी आहे. आपल्या ह्रदयातील ईश्वराचा साक्षात्कार करून देणे हे भागवताचे प्रयोजन आहे.कोणत्याही गोष्टीतील सार, ज्ञान मिळवण्यासाठी. वारंवार वाचन,अभ्यास, विचार, श्रवण करणे आवश्यक असते. सात्विक आहारातून शुध्द मन बनते. निष्काम भक्ती श्रेष्ठ आहे.लौकीक, धनाची चिंता सोडून जीवनाचा खरा आनंद घ्यायला हवा.विश्वास, श्रध्देने श्रीमद् भागवत कथा श्रवण करणे अधिक लाभदायक ठरते.” असेही ते म्हणाले. कथेच्या प्रारंभी राहूल शशिकांत कुलकर्णी,अतुल शरद कुलकर्णी यांनी सपत्नीक आरती आणि ग्रंथ पूजन केले. यशवंत चारठाणकर, सच्चिदानंद डाखोरे, शंतनू पाठक, शिवाजीराव पाठक यांनी अभंग गायन केले.सुत्रसंचलन प्रकाश कुरूंदकर यांनी केले. श्रीमद् भागवत कथेस रावसाहेब कुलकर्णी,राजू पाटोदकर,दिलीपराव भिलेगावकर,सुरेशराव जवळेकर, नागनाथराव चारठाणकर,ज्ञानोबाराव बोराडे, जयप्रकाश बिहाणी, शामराव चौधरी, पांडुरंग मगर, रंगनाथराव मोरेगावकर, एकनाथ थोरात, उर्मिला कुलकर्णी, शांताबाई देशपांडे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.