परभणी, दि 28 (प्रतिनिधी ) : – जिल्हाधिकारी कार्यालयात आज “सेवा हक्क दिन” जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सेवेच्या बांधिलकीची शपथ देत, “लोकसेवा हीच खरी जबाबदारी” असल्याचा संदेश दिला. शासकीय सेवांमध्ये वेळेचे भान, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचा संगम साधत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शासकीय सेवा नागरिकांना निश्चित कालमर्यादेत व पारदर्शक पध्दतीने मिळाव्यात यासाठी दरवर्षी २८ एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, पुरवठा अधिकारी विलास मुसळे, तहसीलदार संदीप राजपुरे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वर्ष 2025-26 मध्ये या अधिनियमातंर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त अर्जांपैकी ९० टक्क्यांहून अधिक अर्जांचा वेळेत निपटारा केल्याबद्दल पुढील अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. सन्मानितांमध्ये उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, जीवराज डापकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, शिवाजी मगर, शितल कच्छवे, संदीप राजपुरे, माधव बोथीकर, उषाकिरण श्रृंगारे आणि कैलासचंद्र वाघमारे यांचा समावेश आहे.