सेलू /प्रतिनिधी कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य,नियोजित अभ्यास व योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्कीच आपल्याला मिळते असे मत करुणा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
बी.डी. एस. (ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप ) व N. M. M. S. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.करुणा कुलकर्णी पुढे म्हणाल्या की ,तुमच्या यशात आई वडील यांचे योगदानसुद्धा महत्वाचे आहे.नियमित अभ्यास करावा व मार्गदर्शक शिक्षकांकडून प्रश्नाची सोडवणूक करून घ्यावी.जिद्द व कठोर परिश्रम हेच यशाचे गमक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करुणा कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून उपेंद्र बेल्लुरकर उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे,रागिणी जकाते,अनिल कौसडीकर,शंकर राऊत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांनी उत्तम विद्यार्थी व्हा व शाळेचा नावलौकिक वाढवा अशी मनीषा व्यक्त केली. मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन चंदू कव्हळे ,प्रास्ताविक नामदेव एकशिंगे,यादीवाचन चेतन नाईक,आभार स्वप्नाली देवडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.