आपला जिल्हा
ज्ञानेश्वर माऊलींच्या गजराने दुमदुमली सेलू नगरी…. भव्य ग्रंथदिंडीने वातावरण झाले भक्तीमय

सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील सातोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत १२ ते १९ मार्च कालावधीत संपन्न होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्या निमित्त ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून बुधवार ( दि. ११ ) रोजी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथडीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या गजराने शहर दुमदुमून गेले.
वातावरण भक्तिमय झाले. ग्रंथडीत माऊलींचा रथ, तुकारामांचे अश्व, ७५० वारकरी पताका, फेटेवाले नागरिक, तुळशीधारी,वृक्षधारी, कलशधारी महिला, टाळकरी, वीणेकरी, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव नावाच्या व्यक्ती, नूतन कन्या प्रशाला, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, यशवंत विद्यालय, नूतन प्राथमिक,शारदा विद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय शाळेतील विद्यार्थी असे परभणी , जालना,बीड, वाशिम, पुणे व आसपासच्या जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक भाविक ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. ग्रंथदींडीचा समारोप सामुहिक पसायदानाने झाला. यावेळी ह.भ.प. पंडित महाराज डाके, अच्युत महाराज दत्तापुरकर, कृष्णा महाराज रासवे, १००८ मनिषानंद महाराज पुरी,शिवाजी महाराज खवणे, शंतनू पाठक उपस्थित होते.





