आपला जिल्हा

सेलू–आष्टी रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण तसेच रेल्वे ओव्हर ब्रिजवरून पाथरी व रवळगावकडे वळण रस्ता देण्याची मागणी

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेऊन सेलू–आष्टी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करणे तसेच सेलू–पाथरी रोडवरील रेल्वे गेटवर सुरू असलेल्या ओव्हर ब्रिजवरून पाथरी व रवळगावकडे वळण रस्ता देण्याची मागणी डॉ. संजय रोडगे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी केली आहे.

सेलू तालुक्यातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक होत असते. तसेच शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. आष्टीकडे जाणाऱ्या बसेस, गर्भवती महिला व आजारी रुग्णांना रुग्णालयात ने-आण करताना रेल्वे गेटमुळे वारंवार अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या सेलू–पाथरी रोडवरील रेल्वे गेटवर ओव्हर ब्रिजचे काम सुरू असून, या पुलावरून पाथरी तसेच रवळगावकडे वळण रस्ता देणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे वाहतुकीची सोय सुलभ होऊन वेळेची बचत होईल व नागरिकांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.

याशिवाय सेलू–आष्टी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण केल्यास वाहतुकीची सुरक्षितता वाढेल व अपघातांची शक्यता कमी होईल.

सेलू तालुक्यातील रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व ग्रामपंचायतींनी याबाबत ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पाठविले आहेत. नागरिकांच्या या न्याय्य मागण्यांचा विचार करून संबंधित कामे तात्काळ मार्गी लावावीत, अशी मागणी डॉ. संजय रोडगे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!