आपला जिल्हा

सेलू तालुक्यात विशेष मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग

नागरिकांना मार्गदर्शन; रास्त धान्य दुकानदारांना सहकार्य करण्याबाबत सूचना

परभणी, दि. ९ (प्रतिनिधी ) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सेलू तालुक्यात गणना फॉर्म वाटप व संकलन मोहिमेला गती देण्यात आली असून, मतदारांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

डिग्रस जहागीर येथे मतदारांना मार्गदर्शन

मौजे डिग्रस जहागीर (ता. सेलू) येथील यादी भाग क्रमांक ४२३ व ४२४ मधील मतदारांना गणना फॉर्म अचूकपणे भरून संबंधित बीएलओंकडे वेळेत जमा करण्याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, बीएलओ, बीएलओ पर्यवेक्षक आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

रास्त धान्य दुकानदारांची बैठक

गणना फॉर्म वाटप आणि संकलन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी सेलू शहरातील रास्त धान्य दुकानदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शिवाजी मगर यांनी दुकानदारांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करावे तसेच नागरिकांनी भरलेले फॉर्म वेळेत जमा करून मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.

कामकाजाचा घेण्यात आला आढावा

सेलू शहरातील यादी भाग क्रमांक ३४०, ३४१, ३४३, ३४४ आणि ३७२ या पाच मतदान केंद्रांच्या ठिकाणी तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी भेट देऊन गणना फॉर्म वाटपाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!