आपला जिल्हा

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप; केंद्रप्रमुखांचा सत्कार

सेलू  ( प्रतिनिधी ) येथील जिजामाता बाल विद्या मंदिर शाळेमध्ये सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी चि. वरद ज्ञानेश्वर बुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तूंचे वितरण करण्याचा हा उपक्रम सलग सातव्या वर्षी उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमामागे सामाजिक कार्याची आवड जपणारे श्री. ज्ञानेश्वर बुरे यांचा पुढाकार असून, समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविला जात आहे. यावेळी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.
याच कार्यक्रमात नुकतेच केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या श्री. मोहजम शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. विवेक कुमार, बुलढाणा अर्बन बँकचे व्यवस्थापक श्री. सुरेश काबरा, तुळजाभवानी बँकचे व्यवस्थापक श्री. मगर साहेब यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. तसेच श्री. कृष्णा शिंदे, श्री. राठी, श्री. खांडविकर, श्री. राजू खरात, श्री. जडे मामा, श्री. गणेश घुमरे, श्री. सोमनाथ बुरे आणि श्री. जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना श्री. मोहजम शेख यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समाजाच्या सहकार्याने शाळेची प्रगती याविषयी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे श्री. सुरेश काबरा यांनी आपल्या मनोगतात जिजामाता बाल विद्या मंदिर शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत, भविष्यात शाळेला आवश्यक त्या वस्तू वस्तुस्वरूपात देण्याचा मानस व्यक्त केला. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रविंद्र पाठक होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक जाणीव जपत वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सामाजिक मूल्ये रुजविणाऱ्या अशा उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. भगवान पावडे यांनी केले, तर श्री. कृष्णकांत खापरखुंटीकर यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती विजयमाला काळे, श्री. विष्णू कटारे, श्री. सुनील राठोड, श्री. मंगेश शेळके आणि श्री. बाळू धनवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी आणि वाढदिवसाचे सामाजिक उपक्रमात रूपांतर करण्याचा आदर्श संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!