परभणी, दि. 1 ( प्रतिनिधी ) — शुभमंगल सावधान…! हा लग्नातला पारंपरिक इशारा आता कायद्याने दिला जाणार आहे. राज्यात बालविवाहाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने महत्वपूर्ण शिफारस केली आहे. त्यानुसार आता लग्नपत्रिकेवर वधु आणि वर दोघांचीही संपूर्ण जन्मतारीख छापणे बंधनकारक होणार आहे. राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे.
राज्यात आजही अनेक ग्रामीण भागात बालविवाह सर्रास होतात. अक्षयतृतीया, देवदिवाळीच्या मुहूर्तावर ही संख्या वाढते. अनेकदा शाळकरी मुलींना शिक्षण अर्धवट सोडून बोहल्यावर चढ़ावे लागते. अशा प्रकरणांवर आळा घालण्यासाठीच लग्नपत्रिकेतुन वयाचा दाखला देण्याचा हा अभिनव उपक्रम आहे.
असा असणार नवीन नियम – नवीन नियमानुसार छपाईसाठी येणाऱ्या प्रत्येक लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख, जन्मस्थळ आणि आधार क्रमांकासह वयाचा पुरावा नमूद करणे बंधनकारक असेल. ही माहिती खोटी आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल होणार आहे.
प्रेस आणि मंगल कार्यालयांवर नजर- या मोहिमेत प्रिंटिंग प्रेस आणि मंगल कार्यालयांकडे महत्वाची जबाबदारी असणार आहे. लग्नपत्रिका छापताना वधूचे वय १८ आणि वराचे २१ वर्षपेक्षा कमी असेल तर प्रेस मालकाने छपाई नाकारावी, असे आदेश राहतील. तसेच मंगल कार्यालय बुक करताना दोघांचे वयाचे पुरावे तपासण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास प्रेसचा परवाना रद्द होण्यासह मालकावरही बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होईल.
विशेष शिक्षकांची केली जाणार नेमणूक – बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण थांबते. विदयार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद स्वतंत्र विशेष शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. लग्न पत्रिकेवर जन्मतारीख बंधनकारक केल्याने वय लपवणे शक्य होणार नाही.
काय आहे शिक्षा -बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाह केल्यास किंवा प्रोत्साहन दिल्यास दोन वर्षापर्यत सश्रम कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. आता लग्न लावणारे भटजी, पुरोहित, फोटोग्राफर, केटरर्स आणि लग्नपत्रिका छापणारे प्रेस मालक यांनाही सहआरोपी केले जाणार आहे. त्यामुळे आम्हाला माहिती नव्हते ही पळवाट बंद होणार आहे.
जिल्हाभरात बालविवाह होणार नाही याबाबत संबंधित सर्वांनी दक्ष राहून परभणी जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याकरीता प्रयत्न करणे आवश्यक आहे. गावात, शहरात बालविवाह ठरला असेल तर त्याबाबत चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल कमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.