महाराष्ट्र

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

बीड ( प्रतिनिधी ) दि. 9 : – म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली, “मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या या पवित्र परंपरेचा समारोप गुरुवारी (दि. ९) कल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी गहिनीनाथ गडाचे विठ्ठल महाराज, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार धनंजय मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, प्रताप ढाकणे, सरपंच शिवा शेकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “संत वामनभाऊ यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. नाथ संप्रदायात गहिनीनाथांचे महात्म्य मोठे असून, या गडावर प्रत्येक काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.” विशेष म्हणजे, या नारळी सप्ताहाचे नियोजन २०३९ पर्यंत निश्चित झाले आहेत यातच या भक्तीकार्याचे यश दिसते .समाजाला एकत्र आणण्याचे हे काम अतिशय मोलाचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी, “गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह कायमस्वरूपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यजमानपदाखाली व्हावा व त्यांनी गड दत्तक घ्यावा,” अशी मागणी केली. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या विचारांवर आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, “संत वामनभाऊ यांनी सुरू केलेला हा सप्ताह आज महंत विठ्ठल महाराज यांच्या जन्मगावी होत आहे, हा योगायोग विशेष आहे. गेल्या २५ वर्षांपासून मला येथे पूजनाचा मान मिळत आहे.”
दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी नगर-बीड महामार्गाच्या कामासाठी भरीव निधी देण्याची मागणी करत, या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांकडे मुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!