आपला जिल्हा
साहित्य चळवळीसाठी संमेलन प्रेरणादायी असतात – प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर
अक्षर साहित्य संमेलनाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) कोणत्याही चांगल्या गोष्टीचा समारोप कधीच नसतो. तर ती एक नवीन सुरुवात असते. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन सर्वदृष्टीने यशस्वी झाले. त्याचे कारण म्हणजे संमेलनाच्या संयोजन समितीने नियोजनबद्ध संघटितपणे केलेले अथक परिश्रम. या पुढेही आपण सर्वजण एकजुटीने सेलूतील साहित्यिक चळवळ अखंडीत ठेवूयात. साहित्य चळवळ गतिमान होण्यासाठी साहित्य संमेलन प्रेरणादायी असतात. असे प्रतिपादन जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. बुधवार ( दि.०८) रोजी शहरातील नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापक कक्षात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.पुढे बोलताना प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर म्हणाले की,” सेलूला समृद्ध अशी सांस्कृतिक, साहित्यिक परंपरा आहे. आधीच्या पिढीचा आदर्श घेऊन शब्दसह्याद्री, अक्षर प्रतिष्ठान साहित्यिक उपक्रम राबविते ही सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची गोष्ट आहे. शहरात साहित्य संमेलन व्हावे ही खूप दिवसांपासूनची इच्छा जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पूर्ण झाली. याचे समाधान आहे. साहित्य संमेलनामुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत होते.” असेही ते म्हणाले. यावेळी संयोजन समितीचे सरचिटणीस प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, स्वागताध्यक्ष सर्जेराव लहाने यांनीही मनोगत व्यक्त केले. साहित्य संमेलनाचा जमाखर्च, लेखापरिक्षित अहवाल अक्षर प्रतिष्ठानचे सचिव डॉ.सुरेश हिवाळे यांनी सादर केला. प्रास्ताविक अक्षर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शरद ठाकर यांनी केले. सुत्रसंचलन सुभाष मोहकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.राजाराम झोडगे यांनी केले. बैठकीस मुख्याध्यापक संतोष पाटील, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, रवी मुळावेकर, गणेश माळवे, डॉ. सतीश मगर,डॉ.अशोक पाठक, माधव गव्हाणे, करूणा बागले यांची उपस्थिती होती.
अक्षर साहित्य संमेलनाने सेलूच्या नावलौकिकात भर पडली
-प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णीसमृद्ध सांस्कृतिक परंपरा असलेल्या सेलूच्या सांस्कृतिक क्षेत्रात जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाने मानाचा तुरा खोवला. शहराच्या नावलौकिकात भर पडली. नवोदित कवी, लेखकांना प्रोत्साहन दिले. लिहित्या हाताना बळ मिळाले. असे प्रतिपादन अक्षर साहित्य संमेलन संयोजन समितीचे सरचिटणीस, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले.



