सेलू ( प्रतिनिधी ) सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, लवकरच बाजार समिती अंतर्गत हळद बीट (Turmeric Auction) सुरू करण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय सुरू आहे.
या निर्णयामुळे सेलू तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांना इतर बाजारपेठांमध्ये जावे लागत होते, ज्यामुळे त्यांना वाहतूक खर्च तसेच वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. मात्र, आता स्थानिक स्तरावरच हळद विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन त्यांना योग्य आणि स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होणार आहे.
सदर बाजार समितीत यापूर्वी कापसाला देखील चांगल्या प्रकारे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्याच धर्तीवर हळद बीट सुरू झाल्यास बाजारपेठ अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे तसेच सर्व संचालक मंडळ सक्रियपणे प्रयत्नशील आहेत.
तसेच, सर्व व्यापारी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, हळद खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपली नावनोंदणी लवकरात लवकर करावी, जेणेकरून बाजारात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळू शकेल.
शेतकरी व व्यापारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे व्यक्त केला आहे.