आपला जिल्हा

जिजामाता बाल विद्या मंदिर शाळेस श्री. मुकुंद आष्टीकर यांची ५० हजार रुपयांची देणगी

सेलू ( प्रतिनिधी ) राजश्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता बाल विद्या मंदिर, सेलू या शाळेस महसूल विभागातील निवृत्त अधिकारी श्री. मुकुंद आष्टीकर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व शाळेच्या भौतिक सुविधांच्या उन्नतीसाठी रु. ५०,००० (पन्नास हजार) इतकी देणगी प्रदान केली. या उदात्त सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. डी. व्ही. मुळे हे होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती श्री. मुकुंद आष्टीकर, ज्येष्ठ शिक्षणप्रेमी श्री. बाबासाहेब चारठाणकर, मुख्याध्यापक श्री. रविंद्र पाठक तसेच श्री. श्रीनिवास आष्टीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. रविंद्र पाठक यांनी प्रस्ताविकातून शाळेची शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच देणगीदारांनी केलेल्या सहकार्याचे महत्त्व विशद केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. मुकुंद आष्टीकर यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवावेत, या भावनेतून आपण ही देणगी दिल्याचे त्यांनी नमूद केले. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिल्यास अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या देणगीतून शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, कपाट, टेबल, व्हाईट बोर्ड, चटया तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. या साहित्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मोठा लाभ होणार आहे.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

अध्यक्षीय समारोपात श्री. डी. व्ही. मुळे यांनी श्री. मुकुंद आष्टीकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा दानशूर व्यक्तींमुळे शैक्षणिक संस्थांना बळ मिळत असल्याचे सांगितले. समाजातील इतरांनीही शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देण्याची प्रेरणा या कार्यातून मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. मंगेश शेळके यांनी केले, तर श्री. भगवान पावडे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती विजयमाला काळे, श्री. कृष्णकांत खापरखुंटीकर, श्री. विष्णू कटारे, श्री. सुनील राठोड आणि श्री. बाळू धनवे, तुकाराम अंभुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!