आपला जिल्हा
परभणी शहरात होणारा बालविवाह पोलिसांनी रोखला

परभणी,( प्रतिनिधी ) दि. १ — चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महिला व बाल विकास विभागाने तातडीने कारवाई करत परभणी शहरात होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवले.
सकाळी सुमारे 10:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह परभणीत होणार होता. माहितीची शहानिशा करण्यासाठी संबंधित बालिकेच्या गावातील ग्रामपंचायतीकडून जन्मनोंद मागविण्यात आली. त्यानुसार बालिकेचे वय 17 वर्षे 6 महिने असल्याचे स्पष्ट झाले, तर विवाहासाठी निवडलेल्या मुलाचे वय 24 वर्ष असल्याचे आढळले.
त्यानंतर नानलपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मल्हार नगर येथे मुलाच्या राहत्या घरी विवाह होणार असल्याची खात्री पटताच पोलीस निरीक्षक गणेश कदम यांना त्वरित माहिती देण्यात आली. तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी मिलिंद वाघमारे यांनाही सूचित करण्यात आले.
जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मोनिका रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे, सुपरवायझर सय्यद इशरत, केस वर्कर बाळू गुंडे, अंगणवाडी सेविका श्रीमती एस. के. वाळवंटे तसेच नानलपेठ पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री. बुधोडकर, एएसआय श्री. एच. एस. मरगळ आणि बीट जमादार बी. के. लिंगायत यांनी संयुक्त पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली.
पथकाने समुपदेशनाद्वारे संबंधित कुटुंबियांना कायद्याची जाणीव करून दिली आणि बालविवाह थांबवण्यात यश मिळवले. पुढील संरक्षण आणि काळजीच्या दृष्टीने बालिकेला बाल कल्याण समिती, परभणी यांच्यासमोर हजर करण्यात आले.
नागरिकांना आवाहन
बालविवाहासारख्या गुन्ह्यांविषयी माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल-फ्री क्रमांकावर कळवावे. बालविवाह रोखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.



