आपला जिल्हा

पंडित महाराज डाके माउली यांना ‘मराठवाडा वारकरी भूषण’ पुरस्कार जाहीर

सेलू ( प्रतिनिधी ) समर्थ सेवा समूह व संतकृपा सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मराठवाडा वारकरी भूषण समर्थ कीर्तनकार गौरव पुरस्कार’ यंदा पंडित महाराज डाके माउली यांना जाहीर झाला आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

वारकरी संप्रदायात सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी पंडित महाराजांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. ‘पाकीटमुक्त कीर्तन’ ही संकल्पना रुजवून त्यांनी भक्ती आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम साधला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे कीर्तन परंपरेत पारदर्शकता व सामाजिक बांधिलकीचा संदेश अधिक बळकट झाला आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने त्यांनी राबविलेला ‘प्लास्टिकमुक्त सप्ताह’ उपक्रमही प्रभावी ठरला आहे. तसेच ऐतिहासिक ज्ञानेश्वरी सप्ताहाचे यशस्वी आयोजन आणि निःस्पृह भावनेतून केलेले सातत्यपूर्ण सेवाकार्य याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
या पुरस्कारामुळे वारकरी परंपरेतील त्यांच्या योगदानाला व्यापक मान्यता मिळणार असून, परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!