आपला जिल्हा

प्रभावी उपाययोजेनेमुळे राज्यात १३ बालविवाह रोखण्यात विभागाला यश

महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

परभणी,( प्रतिनिधी ) दि. २० : राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागाने व्यापक आणि प्रभावी उपाययोजना राबविल्याने राज्यभरात १३ बालविवाह रोखण्यात यश आले, असे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

*राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन मार्गदर्शनाने यंत्रणा सज्ज*

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या दिवशी सामूहिक विवाहांसोबत बालविवाहांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने आधीच सतर्कता बाळगली होती. यासाठी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालविकास विभागाचे सचिव, आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या आणि बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

*राज्यात जनजागृतीचे व्यापक अभियान*

राज्यात जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर जनजागृतीचे व्यापक अभियान राबविण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन १०९८, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समित्या आणि बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून कीर्तन, भागवत, पथनाट्य, पदयात्रा, पोस्टर्स, स्टीकर्स आदी विविध उपक्रमांतून नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. तसेच, बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक घरापर्यंत जनजागृती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

*गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहिती*

मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास अशा विवाहांना आळा घालण्यासाठी मंगल कार्यालय मालक, वाजंत्री पथक, पुजारी तसेच संबंधित नातेवाईकांवर २४ तासांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहितीही नागरिकांना देण्यात आली.

रायगड १, अहिल्यानगर ५, बुलढाणा १, यवतमाळ २, छत्रपती संभाजीनगर १,धाराशिव २, परभणी १ असे एकूण १३ बालविवाह रोखण्यात यश मिळाले.

*महिला व बालविकास विभागाच्या या प्रभावी आणि समन्वयित कारवाई*

या सर्व प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील विविध ठिकाणी होणारे १३ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला व बालविकास विभागाच्या या प्रभावी आणि समन्वयित कारवाईमुळे बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध ठोस संदेश समाजात पोहोचला असून भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!