आपला जिल्हा
सेलू उपविभागात सहा गावांची पाणीटंचाई दूर….उपविभाग प्रशासनाचा संवेदनशील निर्णय

सेलू , दि. २९ (प्रतिनिधी )–जिंतूर तालुक्यात वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सेलूचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी संवेदनशीलता दाखवत सहा गावांसाठी तातडीने ११ पाणीटँकर मंजूर करून दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रशासनाच्या या जलद निर्णयामुळे कौसडी, बोरी, भोसी, हनवतखेडा, शेवडी व वाघी धानोरा या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता निकाली निघाला असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कौसडी येथे ३ टँकर, बोरी येथे ४ टँकर तर भोसी, हनवतखेडा, शेवडी आणि वाघी धानोरा येथे प्रत्येकी १ टँकर मंजूर करण्यात आला आहे. आदेशानंतर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरू करत संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती आणि टँकर कंत्राटदारांना कठोर व स्पष्ट निर्देश दिले आहेत.
उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी आदेशात नमूद केले आहे की, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णतः स्वच्छ, पारदर्शक आणि नियमित पद्धतीने व्हावा यासाठी प्रत्येक टँकरवरील टाक्यांची स्वच्छता, दररोज पाण्याची गुणवत्ता तपासणी, जीपीएस प्रणाली, लॉगबुक नोंदी, महिला सदस्यांच्या स्वाक्षऱ्या, ग्राम पाणी पुरवठा समितीचे निरीक्षण तसेच वेळापत्रकानुसार पाणी वितरण करणे बंधनकारक राहील.
टँकरच्या प्रत्येक फेरीची नोंद जीपीएस प्रणालीवर होणे आवश्यक राहणार असून जीपीएसवर नोंद झालेल्याच फेऱ्यांचे बिल मंजूर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये व टँकर आल्यावर गर्दीमुळे दुर्घटना घडू नयेत म्हणून नागरिकांना पूर्वसूचना देण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाजगी विहीर व बोअरवेल संदर्भातील अधिग्रहण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संबंधित विहीर मालकांची नोंद, ७/१२ उतारा आणि शासन निकषांची पूर्तता तपासूनच पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, श्री. लाहोटी यांनी पाणीटंचाईग्रस्त इतर गावांनाही दिलासा देत, संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा प्रशासनाकडून पाणीटंचाईबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यास तात्काळ पडताळणी करून आवश्यक त्या टँकर मंजुरी देण्यात येतील, अशी ग्वाही दिली, त्यामुळे जिंतूर तालुक्यातील इतर पाणीटंचाईग्रस्त गावांमध्येही प्रशासनाकडून सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
उपविभागीय अधिकारी श्री. लाहोटी यांचा तातडीचा निर्णय आणि काटेकोर नियोजनामुळे प्रशासन नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करत भविष्यातही अशाच तत्परतेने पाणीटंचाईचे प्रश्न सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



