आपला जिल्हा
एच ए आर सी संस्थेकडून आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त निराधार मातेला स्वावलंबनाचा आधार
उदरनिर्वाहासाठी शेळी व करडू भेट

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील कुंडी येथील निराधार विधवा माता वंदना बालासाहेब अंभोरे या पतीच्या निधनानंतर दोन लहान मुलांसह अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. कुटुंबाचा कोणताही स्थिर आधार नसल्याने त्या मोलमजुरी करून आपल्या मुलांचा सांभाळ करीत आहेत.आर्थिक अडचणींमुळे मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे
त्यांच्यासाठी मोठे आव्हान बनले आहे.
कुंडी येथील शिक्षक राम गायकवाड यांनी अंभोरे ताईंच्या परिस्थितीची माहिती संकलित करून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एच ए आर सी), परभणी संस्थेकडे कैफियत मांडली. त्यानंतर संस्थेमार्फत लोकसहभागातून (ता.१०) रविवार रोजी आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त ताईंना उदरनिर्वाहासाठी १ शेळी व १ करडू भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे अंभोरे ताईंना स्वावलंबनाचा नवा आधार मिळाला असून शेळीपालन व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहास मदत होण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठीही हातभार लागणार आहे.मदत मिळाल्यानंतर अंभोरे ताईंनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी एच ए आर सी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक,राम गायकवाड व शरद ठाकर उपस्थित होते.
*लोकसहभागातून दातृत्व*:
या उपक्रमासाठी हार्दिक ठाकर, अंबरेश्वर राठी, आलोक जोशी, विनोद भाला, राम गायकवाड, संतोष बारबिंडे व प्रा. डी. व्ही. दिकीत यांनी आर्थिक सहयोग दिला.
महिला सक्षमीकरणाचा चढता आलेख
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एच ए आर सी संस्थेने विशेष भर दिला आहे. संस्थेच्या वतीने आजवर ९२ निराधार, विधवा व गरजू महिलांना शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या, शेळी-करडू तसेच इतर उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.



