सेलू ( प्रतिनिधी ) कल्याणम् एज्युकेशन सोसायटी, परभणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. सी. व्ही. रमण ज्युनिअर सायंटिस्ट परीक्षा (शैक्षणिक वर्ष 2025–26) अंतर्गत परभणी जिल्हास्तरीय द्वितीय स्तर प्रात्यक्षिक परीक्षा रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय, सेलू येथील विज्ञान ग्रंथालयात उत्साहात पार पडली.
या परभणी जिल्हास्तरीय परीक्षेस प्रथम स्तरावर पात्र ठरलेल्या १०३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षा देत आपली वैज्ञानिक दृष्टी व कौशल्य प्रभावीपणे सादर केली.
यावेळी बोलताना संस्थेच्या सचिव सौ. प्रियांका पाटील यांनी सांगितले की, ही परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी वाढविण्याचा हा उपक्रम आहे. तसेच सैद्धांतिक, प्रात्यक्षिक व सर्वांगीण या तिन्ही अंगांचा विकास घडवून आणणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, या परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील टप्प्यात संशोधन प्रकल्प व मुलाखत घेण्यात येणार असून, त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये ही परीक्षा इयत्ता सहावी व आठवी या वर्गांसाठी आयोजित करण्यात येणार असून, ती मराठी व इंग्रजी माध्यमांतून घेतली जाणार आहे.
या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याणम् एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यसंघाने विशेष परिश्रम घेतले.