सेलू दि १२(प्रतिनिधी) शिर्डीच्या साईबाबांचे गुरू तथा शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या चरित्राचे गद्य रूपांतर पुस्तक प्रकाशन सोहळा काल दि ११ एप्रिल रोजी सायं 6 वा. श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरातील सभागृहात थाटात संपन्न झाला.केशवराज बाबासाहेब महाराज यांचे वंशज अनुराधा प्रभाकर सुभेदार यांनी बाबासाहेब महाराजांच्या ओवीबद्ध असलेल्या ग्रंथाचे गद्य रुपात रूपांतर केलेल्या ग्रंथ प्रकाशन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगर येथील जेष्ठ पत्रकार तथा लेखक शरद देऊळगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजलगाव येथील ह.भ.प.प्रणव पटवारी हे उपस्थित होते.व्यासपीठावर लेखिका अनुराधा प्रभाकर सुभेदार,श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे वंशज तथा श्री के बा शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष ऍड.एल.एम.सुभेदार,डॉ.सुधाकरराव सुभेदार आदींची उपस्थिती होती.श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी ग्रंथाच्या लेखिका अनुराधा प्रभाकर सुभेदार म्हणल्या की, संतश्रेष्ठ दासगणू महाराजांनी श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचे जे चरित्र ओविरुपात लिहिले त्यातून प्रेरणा घेऊनच मी हे गद्य रूपांतर केले आहे.श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे कार्य सर्वांना माहीतच आहे.परंतु त्यांचे कार्य आणखी प्रभावीपणे भविकांसमोर यावे या उद्देशाने,व केशवराज बाबासाहेबांच्या आशीर्वादानेच हे मोठे कार्य सिद्धीला गेला आहे.सुभेदार घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे.हाच इतिहास सुभेदार घराण्याच्या नवीन पिढीला व सामान्य जनतेला देखील कळावे या उद्देशाने या गद्य रूपातील चरित्राचे लिखाण केले आहे.यावेळी सुभेदार परिवाराच्या वतीने सारिका कुलकर्णी व श्वेता स्वप्नील सुभेदार यांनी बाबासाहेब मंदिर संस्थानसाठी पेटी वादनासाठी 15 हजार रु देणगी आणि स्नेहल श्रीमंत यांनी बिछायत खरेदीसाठी 7500 असे एकूण बावीस हजार पाचशे रु.देणगी पुजारी सुधीर मंडलिक यांना देण्यात आली.
प्रमुख पाहुणे ह.भ.प. प्रणव पटवारी म्हणाले की,अनुराधा सुभेदार यांनी श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सुलभ पद्धतीने लिहिले आहे.भगवंताच्या चरित्रापेक्षा संतांचे चरित्र अत्यंत जवळचे असते.या ग्रंथातून महाराजांचे चरित्र समाजाला समजेल.यावेळी पटवारी यांनी श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सविस्तर सांगितले.केशवराज बाबासाहेब महाराज व संत साई बाबा यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून हे चरित्र सर्वांनी वाचावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात शरद देऊळगावकर म्हणाले की,बाबासाहेब महाराजांच्या मंदिरात माझ्यावर बाल संस्कार झालेले आहेत.मंदिरातील नुसत्या सहवासाने जीवन कृतार्थ झाले आहे.हा ग्रंथ मी सुद्धा लिहू शकत होतो परंतु बाबासाहेब महाराजांच्या वंशजांनी हे पुस्तक लिहावं असे मनातून वाटले म्हणून अनुराधा सुभेदार यांना प्रेरित केले.आणि सुभेदार परिवारातील नवीन पिढीलाही आपला उज्वल इतिहास समजावा व भाविकांना समजावा ही भूमिका या ग्रंथ निर्मितीमागे आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक सारिका कुलकर्णी यांनी केले.डॉ सुधाकर सुभेदार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारह.भ.प.संजय पिंपळगावकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय सुभेदार,स्वप्नील सुभेदार,प्रवीण माणकेश्वर,अजित मंडलिक,मोहन खापरखुंटीकर,श्रीराम जाजू व मित्र परिवार,नारायण चौधरी,मृदंगचार्य विठ्ठल महाराज काळे,अण्णासाहेब गायकवाड,बाबासाहेब बदाले,श्याम मुंडे आदींनी परिश्रम घेतले.