सेलू दि ०४(प्रतिनिधी)मानवाला जेव्हा आयुष्याचा शेवट येतो तेव्हा खरा सुखाचा मार्ग कळतो परंतु तेव्हा वेळ गेलेली असते.म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर संत मार्गाला लागल्यास आयुष्यातील खरा सुखाचा मार्ग सापडेल.अगदी तरुण्यातच ज्ञानेश्वरी वाचावी तर आपल्याला खऱ्या सुखाचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.
येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवार दि ०२ एप्रिल ते शनिवार दि ०४ एप्रिल दरम्यान ‘पसायदान’ या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते.
येथील साईबाबा मंदिरात दररोज सायं ०६ ते ०८ या वेळेत श्रीक्षेत्र पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूकर यांनी आज दि ०४ एप्रिल रोजी शेवटचे पुष्प गुंफले
यावर्षी ” किंबहुना सर्व सुखी,पूर्ण होवोनि तिन्ही लोकी,भजिजो आदीपुरुखी,अखंडित” या ओवीवर त्यांनी प्रवचन दिले.
पुढे बोलतांना देगलूरकर महाराज म्हणाले की,विषय सुखात सर्व मानव अडकलेले आहेत.धर्म,अर्थ,काम,मोक्ष म्हणजे पुरुषार्थ नाही तर भ्रमजन्य सुखाला अंतिम मानू नये.विषय सुख हे भ्रामक आहे.यामुळे पसायदानात सकळ मानव जातीच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वरांनी मागणं मागितलं आहे.यामुळे लहानपणापासून सर्वांनी पसायदान आणि ज्ञानेश्वरी,गाथा वाचायला हव्यात तर भ्रामक सुखापेक्षा खऱ्या सुखाचा अर्थ आपल्याला कळेल असेही श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगितले.एकदा भ्रामक सुखाला खरे सुख मानले तर माणूस त्याकडे जास्त ओढवतो आणि त्यातून दुःख मिळत असते.’ किंबहुना सर्व सुखी,पूर्ण होऊन तिन्ही लोकी ‘ हे मागणं म्हणजे पसायदानाचा गाभा आहे.संत ज्ञानेश्वरांनी या ओवीच्या माध्यमातून पसायदानाची मध्यवर्ती संकल्पना मांडली आहे.पसायदान प्रवचनमालेचे हे सातवे वर्ष आहे.आज यावर्षीच्या प्रवचनाची सांगता झाली.सद्गुरू पूजन वसंत प्रतिष्ठानचे महेशराव खारकर व ऍड.उमेशराव खारकर यांनी केले.प्रवचनाचा ऋणनिर्देश ऍड.उमेशराव खारकर यांनी केले.माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी जागा उपलब्ध केली तसेच साथ सांगत करणाऱ्या सर्वांचे आभार ऍड.खारकर यांनी मानले.अभंग गायन सच्छिदानंद डाखोरे, तबला गिरीश दीक्षित,हार्मोनियम शंतनू पाठक,टाळ प्रकाश सुरवसे यांनी साथ दिली.सूत्रसंचालन ह.भ.प.संजय पिंपळगावकर यांनी केले.
*चौकट*
*आम्ही सेलूकर*
शहरातील सर्व मतभेद विसरून सर्वच मंडळी सर्वच कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी सतत धडपडत असतात. मराठवाड्यातील जेष्ठ पत्रकार दिवंगत अनंतराव भालेराव यांनी सेलू शहर हे सामूहिक पुरुषार्थाचे गाव असल्याचे बोलून दाखवले होते. अतिशय मोठ्या व्यक्तीने दिलेली ही मोठी उपाधी शहराला आजही लागू होते .त्याचे कारण शुक्रवारी प्रवचन मध्यावर आले असताना मंडपात आलेल्या एका महिला भाविकाला ,सेलू शहराचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी स्वतः उठून खुर्ची दिली.पद,प्रतिष्ठा ही आपल्या वर्तनातून दाखवण्याचे औदार्य सेलू मधील नेत्यांमध्ये आहे हे सिद्ध झाले.जनसमान्यांमुळे मिळालेले पद हे जनतेसाठी वापरावे हेच या कृतीतून दिसल्याने नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या कृतीच कौतुक झाले.असं हे असामान्यातील सामान्यपण कायम पहावयास मिळत असल्याने सेलु शहराच्या इतिहासातील कोणताही छोटा मोठा सोहळा पूर्णपणे यशस्वी होतो . मराठवाड्याचे पुणे आणि सामुहिक पुरुर्षार्था चे गाव म्हणून संबोधले जाणारे सेलू शहर आजही त्यासाठी पाईक आहे असेच म्हणावे लागेल.