आपला जिल्हा

‘अडगळीतले सूर्य ‘ महिला दिनानिमित्त पेन्शनर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

सेलू( प्रतिनिधी ) येथील पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार ( दि. २३ ) रोजी साई नाट्यगृहात नाट्य लेखक सुरेश झिंजुर्के लिखित आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.अनिल व रोहिणी कुलकर्णी यांची संकल्पना व दिग्दर्शन असलेली स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारी ‘ अडगळीतले सूर्य ‘ या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी हे होते. तर व्यासपीठावर उद्घाटक वैशाली मिलिंद सावंत, प्रमुख पाहुणे नयन साईराज बोराडे, नाट्य संयोजिका रोहिणी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सुनिता काकडे, आशा पहाडे, अनुपमा देवधर, शिला काजळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘अडगळीचे सूर्य’ नाटकेतून आपले खरे आदर्श हे गुगुलवर अथवा सामाजिक माध्यमांत शोधून मिळणार नाहीत. तर ते आपल्या मनात, आसपास आहेत. त्या वास्तविक आदर्शाचे अनुकरण करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी हा संदेश दिला गेला. आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या भारतीय स्त्री शक्तीच्या प्रातिनिधिक पुतळ्यांच्या माध्यमातून नाटिकेत ह्रदयस्पर्शी प्रसंग चित्रित केले गेले. खरे तर ही ‘ अडगळीतली सूर्य ‘ नाहीत तर आपले जीवन उजळून टाकणारी ‘सूर्य ‘ आहेत. त्यांना बाहेर काढले पाहिजे. हे नाटिकेतून सांगितले गेले. ‘ अडगळीतले सूर्य’ नाटीकेतून वीर मातांच्या इतिहासाला उजाळा मिळाला. भालचंद्र गांजापुरकर, शशिकांत देशपांडे, सुनील वाकडीकर यांचे नेपथ्य, सार्थक कुलकर्णी, सुरेश पौळ, प्रज्वल पारवे यांचे संगीत, व प्रकाश योजना आणि हेमलता देशमुख ,अनिता कुलकर्णी, गीता मुळावेकर यांची रंगभूषा व वेशभूषांनी नटलेले नाटक, रसिक प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. सदरील नाटीकेत पद्मजा खारकर (आर्या ), पुजा जोशी (झाशीची राणी), संज्ञा खारकर (इंदिरा गांधी), मिरा देशमुख (सावित्रीबाई फुले ), सोनाली कुबरे (रमाबाई आंबेडकर), सरिता उमरीकर (बहिणाबाई चौधरी), सीमा अष्टीकर (राजमाता जिजाबाई ), मंजुषा बोराडे (आकाश कन्या कल्पना चावला ), रेणुका बोटे (लता मंगेशकर ), सीमा काळबांडे (शाहीर ), रवी कुलकर्णी व रवी मुळावेकर ( चोरांच्या भूमिकेत) तर बाल कलाकारांच्या भूमिकेत हर्षदा मोगल, स्वरा देशपांडे, ऋतुजा राठोड, ईश्वरी कुलकर्णी,आदी स्थानिक कलाकारांनी सहभाग नोंदवला होता.

महिला दिन म्हणजे, कर्तृत्वाचा संदेश

– वैशाली सावंत

भारताच्या इतिहासात महिलांचे कर्तृत्व अनन्यसाधारण आहे .०८ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो. मात्र हा दिवस केवळ महिलांसाठीच महत्त्वाचा नसून ,कर्तृत्वाचा संदेश देणारा दिवस असल्याचे प्रतिपादन वैशाली मिलिंद सावंत यांनी केले आहे. त्या, अडगळीतील सूर्य नाटिकेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भारताच्या इतिहासात जिजामाता, राणीलक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, यांच्यासारख्या महान महिलांनी तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व सिद्ध करून देशाला बलवान केले. जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे घडविले आणि संपूर्ण प्रजेचे रक्षण केले. त्यामुळे अशा वीर मातांचे स्मरण आणि आदर्श कायम आपल्यासमोर राहिले पाहिजेत. अगदी त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी स्त्री शिक्षणाचे दारे खुले केले .राणी लक्ष्मीबाई, रमाबाई यांच्यासारख्या कर्तृत्वान महिलांनी तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला देशासाठी वाहून घेतले. म्हणून आजच्या महिला विविध क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचलेल्या दिसत आहेत .तसेच घरातील संपूर्ण जबाबदारी सांभाळून, मातृत्व जोपासून ,कर्तुत्ववान दिसत आहेत. एवढेच नव्हे तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून , समाजाला सक्षम करत आहेत . याचे संपूर्ण श्रेय आपल्या देशातील वीर मातांनाच असल्याचे वैशाली सावंत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले .यावेळी नयन साईराज बोराडे यांनी मनोगत व्यक्त करून. उपस्थित रसिकांना व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन नारायण इक्कर, हेमलता देशमुख यांनी केले. तर आभारप्रदर्शन हेमलता जोशी यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील असंख्य श्रोते, महिलांचा नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पेन्शनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!