सेलू ( प्रतिनिधी ) मराठी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने गौरावान्वित वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची ११४ वी जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन सेलू येथील नूतन विद्यालयात अनेकविध उपक्रमांनी शुक्रवारी, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आला. यानिमित्ताने ज्येष्ठ मराठी विषय शिक्षक अशोक लिंबेकर यांच्या संयोजनात आयोजित ‘माझी मातृभाषा मराठी’ या विषयावरील लघुनिबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण १३३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मुख्याध्यापक संतोष पाटील आणि उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक शंकरराव बोधनापोड होते.
लघुनिबंध निबंध स्पर्धेत प्रीती बुरकुले ( इयत्ता पाचवी), मोक्षदा कडगे ( इयत्ता सहावी), ऋतुजा महाजन आणि सुयश गिरी (इयत्ता सातवी), पूनम लिंगायत ( इयत्ता आठवी) आणि विश्वजित साखरे व प्रतीक धापसे(इयत्ता नववी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कार्यक्रमात आठवी ड मधील विद्यार्थिनी तृप्ती पवार हिने श्यामची आई पुस्तकातील ‘मुकी फुले’ या कथेचे प्रभावी अभिवाचन केले, तर नववी (ड) मधील विद्यार्थी प्रतिक धापसे याने ‘मराठी भाषेचे महत्त्व’ आपल्या ओघवत्या शैलीत विशद करून उपस्थितांची मने जिंकली. मराठी विभाग प्रमुख डॉ.सुरेश हिवाळे यांनी ‘मराठी भाषेचे वैभव’ या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. शिक्षक बाबासाहेब हेलसकर यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचवेळी जय चौधरी, गजानन शेरे, श्रीरंग डोंबे, ईशान कदम आणि विनायक घोडके या इयत्ता नववी- ब मधील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. वर्षा कदम यांनी आभार मानले. यावेळी शुभांगी आष्टीकर, प्रभू भुसारे, संजय भूमकर आणि संदीप सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.