आपला जिल्हा

ग्रंथवाचन ही प्रत्येकाची सवय होणे हाच मराठी भाषागौरव – डॉ. सुरेश हिवाळे

श्री शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

परभणी (२७) मराठी भाषा व साहित्याला थोर अशी परंपरा असून जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून आज जगभर मराठी ओळखली जाते. मराठी भाषेमध्ये सर्व भाषेपेक्षा जास्त संमेलने, उत्सव, मेळावे संपन्न होतात. मराठीतील प्राचीन साहित्य उदात्त जीवनमूल्ये संस्कारीत करते. भाषा जगली तरच संस्कृती टिकते. मराठी भाषा, साहित्य,समाज, संस्कृतीचे दर्शन भाषेतून होते. तेव्हा माय मराठीच्या वाचन, लिखाणानेच मराठी भाषा संपन्न होईल. ग्रंथवाचन ही प्रत्येकाची सवय होणे हाच मराठी भाषागौरव ठरेल असे मत डॉ. सुरेश हिवाळे यांनी व्यक्त केले.

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते तर मंचावर उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे, संगीत विभाग प्रमुख प्रा.सविता कोकाटे याची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने घेण्यात आलेल्या काव्यवाचन, गीत गायन, वक्तृत्व, निबंध लेखन, भितीपत्रक स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संगीत व मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठीतील प्रसिद्ध गीते सादर केली. त्याचबरोबर सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले, आज आपल्या भाषेला विद्यार्थ्यांना कमी लेखता कामा नये. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या काळात मराठी भाषेलाही विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. मातृभाषेतून सर्व संकल्पना स्पष्ट होतात. मराठी माणूस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज प्रगती करत आहे. तेव्हा बदलत्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन भाषा क्षेत्रातील करियर, संधी विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. मराठी विभागाने घेतलेल्या अशा स्पर्धेतील सहभागामुळेच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास होतो. मराठी भाषेमध्ये उत्तम साहित्यकृती आपण निर्माण कराल अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त करीत विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद भोपे यांनी केले, अतिथींचा परिचय कु. आरती गिराम हिने, सूत्रसंचालन डॉ. राजू बडूरे यांनी तर आभार प्रा. अनिल बडगुजार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. स्वाती देशमुख, प्रा. अंकुश खटिंग, प्रा. माया रोडगे, प्रा.अमोल गवई, प्रा.महेश काटे, प्रा. कृष्णा शिनगारे, प्रा. वसमतकर, बाळकृष्ण पोखरकर, सुरेश पेदापल्ली, साहेबराव येलेवाड यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!