आपला जिल्हा

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘Word Champion’ स्पर्धा

-इंग्रजी भाषिक शब्दसंपदा वाढीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांचा अभिनव उपक्रम

सेलू (प्रतिनिधी):शालेय विद्यार्थ्यांचे इंग्रजी अध्ययन अधिक प्रभावी, दर्जेदार व स्पर्धात्मक व्हावे यासाठी जिल्हा परिषद परभणीच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी ‘Word Champion’ या अभिनव उपक्रमाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दसंपदा समृद्ध करणे, शब्दांचे अचूक अर्थ समजून घेणे आणि भाषिक आत्मविश्वास वाढविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शब्द पाठांतराची सकारात्मक चढाओढ निर्माण व्हावी, शब्दांचा योग्य वापर करता यावा आणि अध्ययनात उत्साह वाढावा, यासाठी तालुकास्तरावर वेळापत्रकानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या तीन संघांची निवड करून त्यांना जिल्हास्तरीय ‘Word Champion’ स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे.

शाळा, केंद्र व तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार असून, त्यांच्या स्तरावरून बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या अधिनस्त इंग्रजी साधनव्यक्ती तसेच एक विस्तार अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद परभणीच्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबाबत आत्मविश्वास वाढून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच भर पडणार आहे.

‘Word Champion’ स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी पंचायत समिती स्तरावर काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक शाळा, केंद्र व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे

-गजानन वाघमारे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सेलू

 

विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयावरील भीती दूर करण्यासाठी आणि त्यांची भाषिक शब्दसंपदा वाढविण्यासाठी ‘Word Champion’ स्पर्धा निश्चितच उपयुक्त ठरेल. शब्दसंपदा वाढल्यास विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी संभाषण करू शकतील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम नवी संधी निर्माण करणारा ठरेल.-उदय जाधव,गट विकास अधिकारी,पंचायत समिती सेलू

Related Articles

Back to top button
Don`t copy text!