सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालयातील १९७२ च्या दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह-मिलनाचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक शंकरराव मंडलिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने श्री बालाजी मंदिराच्या सिंदूर सभागृहात शनिवार ( दि. १३ ) रोजी उत्साहात पार पडले. माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, उद्योजक रामप्रसाद घोडके, ज्ञानेश्वर सोळंके, श्याम मणियार, मुजीब घोरी, डॉ. सुभाष परतानी, रमा सोमैय्या, माणिक रोडगे, डॉ. ईश्र्वरचंद्र हुरकट यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दोन दिवसीय स्नेह – मिलन सोहळ्यात ५८ माजी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तर ३३ माजी विद्यार्थी सपत्नीक सहभागी आहेत. स्नेह – मिलन सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वर्ग मित्रांची आठवण मनात होतीच. पण जीवलग मित्रांना प्रत्यक्ष पाहून स्वर्ग सुखाचा आनंद झाला. व्हाट्सअप समुहाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या वर्ग मित्रांना ५३ वर्षांनंतर भेटण्याची सुवर्ण संधी या स्नेह- मिलनातून मिळाल्याची भावना सर्वच माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. स्वागतपर मनोगत हेमंतराव आडळकर यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. भगवान टेकाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पुष्पा झंवर यांनी केले.
वर्ग मित्रांनी केले दिवंगत शिक्षक, वर्ग मित्रांचे स्मरण
कार्यक्रमस्थळी फोटो लावून १९७२ च्या दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी ३२ दिवंगत शिक्षकांना ‘ आमचे गुरूजन: आदरभावनेचे केंद्रस्थान ‘ या शब्दात तर दिवंगत ३१ वर्ग मित्रांनाही अभिवादन केले. शिक्षक आणि वर्ग मित्रांच्या आठवणीने माजी विद्यार्थी क्षणभर भावनिक झाले होते.