आपला जिल्हा

इस्रायलमध्ये ३५०० होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र इंटरनॅशल पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

परभणी दि. 6( प्रतिनिधी ) : नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इस्रायलमध्ये घरगुती केअरगिव्हर (Home Based Caregiver) या पदासाठी ३५०० उमेदवारांची मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आरोग्य आणि सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, इच्छुक उमेदवारांनी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या अधिकृत संकेतस्थळावर https://maharashtrainternational.com नोंदणी करणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेत ९० टक्के महिला आणि १० टक्के पुरुष उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्जदाराचे वय २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे आणि किमान १० वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. शारीरिक पात्रतेनुसार उमेदवाराची उंची किमान १.५ मीटर आणि वजन ४५ किलो किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी भाषेचे मध्यम स्तरावरील (Intermediate) ज्ञान असणे गरजेचे आहे.

शैक्षणिक व तांत्रिक पात्रतेनुसार उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवेमध्ये किमान ९९० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवायफरी यापैकी मान्यताप्राप्त संस्थेचा डिप्लोमा किंवा पदवी (GDA/ANM/GNM/B.Sc Nursing) धारण केलेली असावी.
निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ६४४३.८५ इस्रायली न्यू शेकेल (NIS) म्हणजेच अंदाजे १, ९९, ७७० रुपये इतके आकर्षक वेतन मिळणार आहे. याशिवाय नियोक्त्याकडून राहण्याची सोय, भोजन आणि वैद्यकीय विम्याची सुविधा देण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. नोंदणीनंतर पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाइन व व्हिडिओ मुलाखतीद्वारे पार पडणार आहे.

उमेदवाराने यापूर्वी कधीही इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचे जवळचे नातेवाईक (पती/पत्नी, पालक किंवा मुले) सध्या इस्रायलमध्ये कार्यरत नसावेत. निवड प्रक्रियेसाठी पोलीस पडताळणी अहवाल (PCC) आणि वैद्यकीय तपासणी अनिवार्य राहील.

अधिक माहितीसाठी व अर्जासाठी उमेदवारांनी अधिकृत पोर्टलला भेट द्यावी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, एल.एन.एस.बी.-४ हॉल क्र., तळमजला, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री .खंदारे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!