आपला जिल्हा
मराठा सेवा संघाने समाजाला विधायक दिशा दिली – मधुकर महाराज बारुळकर
मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन सेलूमध्ये उत्साहात संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) मराठा सेवा संघाने गत ३४ वर्षात विविध जाती,धर्मात जातीय-सामाजिक,धार्मिक सलोखा निर्माण केला. सर्व जाती-धर्माला एकत्रित बांधले. त्यांच्यात बंधुभाव निर्माण केला.सोबतच मराठा सेवा संघाने समाजाला विधायक दिशा दिली असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार तथा वक्ते मधुकर महाराज बारुळकर यांनी केले.ते मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त सेलू तालूका शाखेच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा,शिवकुटुंब मेळावा व समाज प्रबोधनात्मक व्याख्यान कार्यक्रमात शहरातील साई नाट्यगृहात शुक्रवार ( दि. ६ सप्टेंबर) रोजी बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व दीपप्रज्वलन करू जिजाऊ वंदनेने झाली. जिजाऊ वंदना डॉ.भास्कर शिंदे व सच्चिदानंद डाखोरे यांच्या संचाने सादर केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे हे होते. तर विचारमंचावर विभागीय अध्यक्ष बाळासाहेब यादव,जिल्हा उपाध्यक्ष सुनील जाधव,जिल्हा प्रवक्ता सुभाष ढगे,माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव जोगदंड, जनार्दन पाटील,तालुकाध्यक्ष सर्जेराव लहाने यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मधुकर महाराज बारुळकर म्हणाले की, ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार जनमानसात रुजवून माणसाला माणूस जोडण्याचे मानवतावादी कार्य मराठा सेवा संघ करत आहे. ‘
काळानुसार व्यवसाय करावा
– विठ्ठल भुसारेशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे म्हणाले की, ‘ समाजातील युवकांनी काळाची पावले ओळखून वाटचाल करावी.काळानुसार आपल्या व्यवसायात बदल करुन यशोशिखरे गाठावीत.उच्च शिक्षणातून स्वतः ची आणि समाजाची प्रगती साधावी.सध्याचा काळ हा ज्ञान,तंत्रज्ञान,स्पर्धेचा आहे. या काळात संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. आपली क्षमता,अंगभूत कौशल्य वाढवून आधुनिक युगातील संधीचे सोने करावे. ‘