आपला जिल्हा

ढालेगावच्या श्री समर्थ वेद विद्यालयाला स्वातंत्र्य सैनिक कै. वि.वा. देसाई स्मृती पुरस्कार प्रदान

पाथरी ( प्रतिनिधी ) तालुक्यातील ढालेगाव येथील श्री समर्थ वेद विद्यालयाने केलेल्या उल्लेखनीय सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा स्वातंत्र्य सैनिक कै. वि.वा. देसाई (देशपांडे) स्मृती पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्र, छत्रपती संभाजी नगरच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवार (दि.१४) रोजी आयोजित भव्य सोहळ्यात स्वातंत्र्य सैनिक वि.वा. देसाई पुरस्कार श्री समर्थ वेद विद्यालयास प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. रामराव हेंडगे गुरूजी होते. सांस्कृतिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला श्री समर्थ वेद विद्यालयाचे अध्यक्ष जयप्रकाश बिहाणी, संजय लड्डा, सारंग टाकळकर, सुरेश देशपांडे, सदाशिव पोहोंडुळकर, सुरेंद्र तोष्णीवाल, पंडित महाराज डाके, सिताराम मंत्री, डॉ. विलास मोरे, श्रीपाद कुलकर्णी, विष्णू चेचानी, कल्पना भुतडा, संगीता तिवारी, चंचल लढ्ढा, सुरेश शुक्ला यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकार स्विकारल्यानंतर श्री समर्थ वेद विद्यालयाचे अध्यक्ष जयप्रकाश बिहाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थेच्या कार्याची ओळख करून देताना ते म्हणाले की,“ श्री समर्थ वेद विद्यालयातून आतापर्यंत सुमारे ३५० विद्यार्थी वेदाचे शिक्षण घेऊन बाहेर पडले असून ते देशभर भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. श्री समर्थ वेद विद्यालयात बालकांवर भारतीय संस्कृती, परंपरा जपण्याचे संस्कार केले जातात. यातून नैतिक मूल्ये जपणारी आणि देशाचे भविष्य उज्वल करणारी पढी घडेल.” हा विश्वासही जयप्रकाश बिहाणी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राष्ट्रहिताची भावना जोपासत समाजाभिमुख कार्य करणाऱ्या संस्थांना स्वातंत्र्य सैनिक कै.वि.वा. देसाई पुरस्कार देण्यात येतो, असे आयोजकांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अशोक चिंदूरवार यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. तर आभार संजय लड्डा यांनी मानले. श्री समर्थ वेद विद्यालयाला मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे ढालेगावच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, परिसरातून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!