आपला जिल्हा

सुशिक्षित बेरोजगारांसाठी १५ एप्रिल रोजी रोजगार मेळावा

परभणी ( प्रतिनिधी ) , दि. १३ :जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र, शिवाजीनगर (दिंडोरी प्रणित), शाखा क्र. १, वसमत रोड, परभणी येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत आयोजित या मेळाव्यात विविध नामांकित उद्योग व खाजगी आस्थापनांचा सहभाग राहणार असून, दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर आदी पात्रताधारक उमेदवारांसाठी विविध पदांवर भरती केली जाणार आहे.

बँक ऑफिसर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, क्षेत्र अधिकारी, नर्सिंग, वॉर्डबॉय, रिसेप्शनिस्ट, सेल्स प्रतिनिधी, कृषी अधिकारी, ट्युनिंग ऑपरेटर, विमा सल्लागार, विमा सखी, लाईफ मित्र आदी पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना प्रारंभी मासिक वेतन १० हजार ते २५ हजार रुपये देण्यात येणार असून, अनुभवाच्या आधारे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा ६,००० ते १०,००० रुपये इतके विद्यावेतन ११ महिन्यांसाठी दिले जाणार आहे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in⁠ या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी. तसेच दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संबंधित ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२४५२-२२००७४ वर संपर्क साधावा.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!