आपला जिल्हा

सेलू येथे मान्सुनपूर्व तयारीचा आढावा संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज…

सेलू दि. 15 ( प्रतिनिधी ) : सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे (दि. 12) रोजी सन 2026 मान्सुनपूर्व तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे सेलू उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सेलू तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्या उपस्थितीत पार पडली.

बैठकीस नगर परिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, निम्न दुधना प्रकल्प, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग तसेच महसूल व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आगामी मान्सुन काळात संभाव्य पूरस्थिती, अतिवृष्टी, नाले सफाई, धोकादायक इमारती, वीज व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, पिकांची परिस्थिती तसेच आपत्कालीन यंत्रणेच्या तयारीबाबत विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.

उपविभागीय अधिकारी श्री. लाहोटी यांनी सर्व संबंधित विभागांना मान्सुनपूर्व आवश्यक उपाययोजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व साहित्य उपलब्ध ठेवून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

मान्सुन कालावधीत नैसर्गिक आपत्ती संदर्भात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधता यावा यासाठी तहसील कार्यालय सेलू येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी 9420547046 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!