सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत केमापूर येथे भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘घर घर संविधान ‘ उपक्रम व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शुक्रवार ( दि. २४ ) रोजी नूतन विद्यालयातील सहशिक्षक, कवी डॉ. सुरेश हिवाळे यांचे व्याख्यान झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, ” आपल्या आदर्श भारतीय संविधानाने सर्वसामान्यांच्या प्रगतीचे मार्ग खुली केली आहेत. सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक मुलभूत अधिकार दिली आहेत. सोबतच आपल्याला कुटुंब, समाज, राष्ट्राप्रतिच्या कर्तव्याची जाणीवही करून दिली आहे. लोकशाही मुल्यांची संस्कार आपल्यावर करणाऱ्या भारतीय संविधान घराघरात वाचले जावे. ” असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. शरद ठाकर हे होते. तर व्यासपीठावर नारायण आष्टकर, दगडोबा माघाडे यांची उपस्थिती होती. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलताना डॉ. सुरेश हिवाळे म्हणाले की, ‘ आपली मातृभाषा मराठीला समृद्ध अशी परंपरा आहे. मराठीत खुप छान बालसाहित्य आहे. ते विद्यार्थ्यांनी वाचावे. वाचनातून व्यक्तिमत्त्व विकासासह विद्यार्थी संस्कारित होतात. ‘ असेही ते म्हणाले. प्रास्ताविक प्रभावती घुगे यांनी केले. सुत्रसंचलन प्रणिता गाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दगडोबा माघाडे यांनी केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत केमापूर येथे घर घर संविधान व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलताना डॉ. सुरेश हिवाळे, मंचावर मुख्याध्यापक डॉ. शरद ठाकर, नारायण आष्टकर, दगडोबा माघाडे.