आपला जिल्हा
शोभायात्रा आणि सजीव देखावे ठरले सेलूकारांना आकर्षण
सेलूमध्ये अवतरली अयोध्यानगरी, शोभायात्रेने श्रीरामकथेला प्रारंभ

सेलू, दि.१५ प्रतिनिधी : राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या श्रीराम कथेच्या निमित्ताने मंगळवारी, १५ ऑक्टोबररोजी सकाळी नऊ वाजता शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीरपासून क्रांतीचौक, नूतन विद्यालय, स्टेशनरोड सारंगीगल्ली हनुमान मंदिर, बिहाणी यांचे घर या मार्गाने श्री बालाजी मंदिरमध्ये शोभायात्रेची सांगता झाली. शोभायात्रेत श्रीरामायण ग्रंथ दिंडी, बँड पथक, धर्म ध्वज, अश्व, मारोती ध्वजधारी युवक, लेझीम पथक मुले-मुली, श्रीराम उत्सव मूर्ती, कलशधारी, तुळसधारी माता भगिनी, महिला भजनी व वारकरी भजनी मंडळ, वेद विद्यालयाचे विद्यार्थी, स्वामीजींचा रथ, माता-भगिनी, बंधू उत्साहाने सहभागी झाले होते.
पुरूषांचा शुभ्र परिधान, भगव्या टोप्या व रूमाल, महिलांचा भगवा परिधान तसेच भगवे ध्वज यामुळे वातावरण फुलून गेले होते. शोभायात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा स्वामीजी यांच्या रथावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. शोभायात्रेतील उपस्थित मान्यवरांनी पालखी खांद्यावर घेऊन आपला सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचे लेझीमपथक, भव्य श्रीरामची उत्सव मूर्ती, कलशधारी व तुळसधारी माता भगिनी, वारकरी भजनी मंडळी शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. शोभायात्रेत शहरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.