परभणीतून महायुतीच्या वतीने महादेव जानकरच

परभणी( प्रतिनिधी ) राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे महायुतीच्या वतीने परभणीतून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी जानकरांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरवले जाईल अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र आता रासपच्या जागेबाबत सस्पेन्स संपला विविध चर्चांना पुर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
जानकर हे महाराष्ट्राच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक असून ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2003 मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देंवेद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भुषवले होते. 2014 मध्ये त्यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूक लढवली होती.
दोन दिवसांपूर्वी जानकर यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकर यांनी हा निर्णय घेतला. महायुतीने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा सोडली असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ही जागा नक्की कोणती असणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी महादेव जानकरांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरवलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र या सगळ्याबाबत आता महादेव जानकर यांनी खुलासा करत आपण परभणीतून लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि.26) दुपारी परभणी लोकसभा मतदारसंघाकडे प्रचारार्थ निघत असताना बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येेथे लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांच्या निवासस्थानी प्रज्ञाताई मुंडे यांची भेट घेवून जानकर यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.