आपला जिल्हा
नूतन विद्यालयात शिक्षक झाले अधिकारी, अन् विद्यार्थी मतदार
सेलूच्या नूतन विद्यालयात 'लोकशाही उत्सव' उत्साहात

सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत मंगळवारी (३० जानेवारी) ‘लोकशाही उत्सव’ साजरा करण्यात आला. या वेळी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट तसेच मतपत्रिका अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थी संसद अभिरूप निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. या निमित्ताने शिक्षक झाले अधिकारी, अन् विद्यार्थी मतदार, असे चित्र पाहायला मिळाले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी अभिरूप मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक शरद ठाकर, हेमांशी ईश्वर जैन यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार विजय मोरे, सेलू बाजार समितीचे संचालक तथा भाजप तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, शिवसेनेचे माजी नगरसेवक मनीष कदम, एच.जी.बुचाले, पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ॲड.दत्तराव कदम म्हणाले की, मतदार जागृती आणि मतदान साक्षरता या दृष्टीने नूतन शाळेचा उपक्रम आदर्श आहे. अन्य निडणुकांप्रमाणे शाळेतील अभिरूप मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली, असे विजय मोरे यांनी नमूद केले. प्रतीक ठाकर याने मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बाबासाहेब हेलसकर यांनी केले. सूत्रसंचालन गोपाळ आम्ले यांनी केले. वर्षा कदम यांनी आभार मानले. उपक्रमासाठी नारायण सोळंके, एस.एस.पांडे, बी.एस.हेलसकर, बी.एम.देवकते, एस.डी.गांजापूरकर, वर्षा कदम, प्रतिज्ञा चव्हाण, सुजय कांबळे, अशोक लिंबेकर, काशीनाथ पल्लेवाड, संभाजी रोडगे यांनी पुढाकार घेतला.
अभिरूप मतदान केंद्राने वेधले लक्ष
दोन जागांसाठी एकूण अठरा उमेदवार रिंगणात होते. ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट तसेच मतपत्रिका अशा दोन्ही पद्धतीने १११ पैकी एकूण ७२ विद्यार्थी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक संतोष पाटील, सहायक किरण देशपांडे, देविदास सोन्नेकर, तर शिक्षकांनी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले. तहसीलदार दिनेश झांपले यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर ट्रेनर संतोष मलसटवाड, गजाजन साळवे, एच.जी.बुचाले यांनी मतदान जागृती अभियानांतर्गत मतदान प्रक्रियेसाठी सहकार्य केले. यासाठी शाळेमध्ये उभारण्यात आलेल्या अभिरूप मतदान केंद्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
सेलू (जि.परभणी ) येथील नूतन विद्यालयात मंगळवारी लोकशाही उत्सव-विद्यार्थी संसद निवडणूक पार पडली. विजयी विद्यार्थी प्रतिनिधींसह नायब तहसीलदार विजय मोरे, संतोष पाटील, ॲड.दत्तराव कदम, मनीष कदम आदी.