आपला जिल्हा

परभणी लोकसभा निवडणूक मतदानाकरीता मतदान केंद्र सज्ज

2 हजार 290 मतदान पथकाद्वारे राबविण्यात येणार मतदान प्रक्रिया

परभणी, दि.25 (प्रतिनिधी ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवार, (दि.26) मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 96-परभणी विधानसभा मतदार संघातील 333 मतदान अधिकाऱ्यांची पथके जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत आज गुरुवार, (दि.25) रोजी संबंधीत मतदान केंद्राकडे रवाना झाली असून, परभणी लोकसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रे सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, प्रा. गणेश शिंदे यांची उपस्थिती होती.

परभणी लोकसभा मतदार संघात 26 एप्रिल रोजी मतदान होत असून, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. परभणी लोकसभा मतदार संघात एकुण 47 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात 95-जिंतूर विधानसभा मतदार संघात 10 तर 96-परभणी मध्ये 08, 97-गंगाखेड मध्ये 17, 98-पाथरी 07, 99-परतूर 03 आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघात 02 संवेदशील मतदान केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यातील सुमारे 1 हजार 145 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

परभणी लोकसभा मतदार संघात एकूण 2 हजार 290 मतदान केंद्रे आहेत. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात 424 मतदान केंद्र तर परभणी 333, गंगाखेड 432, पाथरी 398, परतूर 350 आणि घनसावंगी मध्ये 353 मतदान केंद्रे आहेत. यात सहाय्यकारी मतदान केंद्रांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी दिली. या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, ही पथके देखील आज मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत. मतदान पथकांसोबत प्रथोमपचार वैद्यकीय किट, ओआरएस आदी औषधी दिली आहेत.

परभणी लोकसभा मतदार संघात 14 महिला मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामध्ये जिंतूर, परभणी, परतुर आणि घनसावंगी विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 02 तर गंगाखेड आणि पाथरी मतदार संघात प्रत्येकी 3 महिला मतदान केंद्र असणार आहे. तसेच दिव्यांग 9 आणि युथ 13 मतदान केंद्रे असणार आहे.

परभणी लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया शांतता आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी 2 हजार 290 मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यासह 11 हजार 450 अधिकारी/कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. शिवाय 1 हजार 145 कर्मचारी हे राखीव आहेत. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असुन, संवेदशील मतदान केंद्रावर अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मतदान संपल्यानंतर सर्व मतदान पथके संध्याकाळी वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्रॉगरुम मध्ये निवडणूक निरिक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, उमेदवार, प्रतिनीधी यांच्या उपस्थितीत सर्व मतदान यंत्र सिलबंद केली जाणार असल्याची माहिती ही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!