आपला जिल्हा

सूक्ष्म निरिक्षकांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपले काम पार पाडावे – जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे

परभणी, दि.18 ( प्रतिनिधी ) : लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणारे निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑर्ब्जव्हर्स) निवडणूक आयोगाचे कान-डोळे असून, या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपले काम चोख पार पाडावे अशा सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (दि.18) संपन्न झालेल्या सुक्ष्म निरीक्षकांच्याबैठकीत मार्गदर्शन करताना श्री. गावडे बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, सुनिल हट्टेकर यांची उपस्थिती होती.

यावेळी श्री. गावडे म्हणाले की, मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोलींग (अभिरुप मतदान) मतदान प्रक्रिये पासून ते सायंकाळी मतदान संपेपर्यत घडणाऱ्या सर्व घटनांचे अवलोकन करुन त्या माहितीचा अहवाल निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो. मतदानासाठी इव्हीएम यंत्र तयार करणे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अभिरुप मतदानाची पद्धत, मतदान यंत्राबाबत करावयाची कार्यवाही अचूकरित्या होत असल्याचे निरीक्षण करावे. तसेच मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच सरमिसळ किती स्तरावर होते, मतदान केंद्र पथक कधी निश्चित होतात सांगून या सर्व बाबी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि मतदानाच्या दिवशी पक्षांचे मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पाडावी व त्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

तसेच मतदानाच्या वेळी घडणाऱ्या अनुचित घटना, तक्रारीचे प्रसंग अथवा कोणतीही कायदा मोडणारी बाब यावर कारवाई करण्यापूर्वी निवडणूक आयोग हा सुक्ष्म निरीक्षकाकडून आलेल्या अहवालाची दखल घेतो. सूक्ष्म निरीक्षकाचे काम हे संवेदनशील असून, निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या मतदान प्रक्रियेची संपूर्ण सविस्तर माहिती आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सुक्ष्म निरीक्षकास असणे आवश्यक आहे. सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती संवदेनशील मतदान केंद्रावर अथवा तणावग्रस्त वातावरणाच्या ठिकाणी करण्यात येते. या निवडणूका नि:पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले.

उप जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. विधाते म्हणाले की, निवडणूक सुक्ष्म निरीक्षक हे मुख्य निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगास उत्तरदायी असतात. त्यामुळे मतदान प्रक्रियेत सुक्ष्म निरिक्षकांची भूमिका खुप महत्वाची असणार आहे. मुख्य निवडणूक निरिक्षक हे मतदार संघात सर्वच ठिकाणी पोहोचू शकत नसल्याने मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले सुक्ष्म निरीक्षक हे मुख्य निवडणूक निरिक्षक आणि भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणुन काम करतात.

यावेळी श्री. विधाते यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांनी करावयाच्या कामकाजाबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर करत सूक्ष्म निरीक्षकांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर होणारी कामकाज प्रक्रिया, तेथील अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेची सविस्तर माहिती दिली. यावेळी परभणी लोकसभा मतदार संघाकरीता नियुक्त करण्यात आलेले सर्व सुक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!