आपला जिल्हा

प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचा ‘व्हायब्रंट इंडिया’ सांस्कृतिक कार्यक्रम थाटात संपन्न

सेलू: ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सुरभी महोत्सव 2024 अंतर्गत प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचा ‘व्हायब्रंट इंडिया’ सांस्कृतिक कार्यक्रम दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सॅनरो नॉलेज सिटी येथे थाटात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. रामराव रोडगे, डॉ. गणेश पारवे, डॉ. अपूर्वा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेंद्र शिंदे (उपप्राचार्य, नूतन महाविद्यालय, सेलू), एडवोकेट दत्तराव कदम, अजय डासाळकर, अनिल पवार, केशव सोळंके, डॉ. ऋतुराज साडेगावकर, आकाश टाक, डॉ. दत्तात्रय काकडे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला प्रगती क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘व्हायब्रंट इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विविध सादरीकरणे सादर केली. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यसंग्रामातील वीर, भारतरत्न रतन टाटा, विविध राज्यांची संस्कृती, इंडियन आर्मी यावर आधारित प्रस्तुती, रामायणावर आधारित संगीतमय नाटिका आणि नवीन शिक्षण पद्धतीवरील नृत्य-नाट्य यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमात ‘प्रिन्स ऑफ द स्कूल’ किताब अथर्व नंद यांना तर ‘प्रिन्सेस ऑफ द स्कूल’ किताब खुशी मानधने यांना प्रदान करण्यात आला. विविध विषयांतील प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून डॉ. संजय रोडगे यांच्या नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय रोडगे यांनी 1999 पासून 2024 पर्यंतच्या प्रतिष्ठानच्या संघर्षमय प्रवासाचे स्मरण उपस्थित पालकांना करून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भाबट, रीना ठाकूर, तसेच विद्यार्थिनी तनिष्का तेलभरे, गायत्री पावडे, तत्वमशी शिंदे व तेजश्री चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!