सेलू ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील नागर जवळा येथे एका ४० वर्षीय महिलेच्या विनयभंग प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात सोमवार २९ जानेवारी रोजी रात्री ००:११ वाजता दोन जणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे मानवत तालुक्यातील नागरजवळा येथे डीजेच्या आवाजात मिरवणूक सुरू असताना मिरवणूक पुढे गेल्यानंतर पांडुरंग त्र्यंबक होगे व दिनेश प्रभाकर होगे हे तरुण या ४० वर्षीय महिलेच्या घरात घुसले. तेव्हा महिला चांगलीच घाबरली होती. ही घटना २८ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली पांडुरंग होगे आणि दिनेश होगे यांनी या महिलेस तुझा नवरा मुंजा रासवे कुठे आहे. असे म्हणाले तेव्हा नवरा शेतात दारे धरण्यासाठी गेला असे म्हणताच उभयतांनी आता आम्हीच तुझे नवरे आहोत असे म्हणत दिनेश होगे याने वाईट हेतूने महिलेचा हात धरला तर पांडुरंग होगे यांने साडीचा पदर ओढला या झटापटीत ४० वर्षीय विवाहित महिलेने मदतीसाठी सासू व जाऊ यांना जीवाच्या आकातांने आवाज देऊन बोलावले. या दोघी येताच त्या दोघींनाही ढकलून दिल्याने त्या जखमी झाल्या आहेत. पुन्हा या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना दोघेही रस्त्यात असलेल्या मिरवणुकीकडे पळून गेले.
या घडलेल्या प्रकाराची वाच्यता गावात सर्वत्र झाली.घडलेल्या प्रकारामुळे महिलेच्या पतीसह माळी समाजातील सर्वच जण मानवत पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलीस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग होगे, दिनेश होगे यांच्यावर गुरनं४१/२०२४ कलम ४५२,३५४,३२४,३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची खरी वस्तुस्थिती नेमकी काय आहे. ती मिरवणूक कशाची होती. महिलाच्या घरात घुसून नवऱ्याची चौकशी का केली. या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी शोधल्याशिवाय त्या निरापराध ४० वर्षीय महिलेला न्याय मिळणार नाही.