आपला जिल्हा

विद्यार्थ्यांच्या नाट्य कला गुणांना वाव देणारे शिबिर- धनंजय सरदेशपांडे

नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

सेलू ( प्रतिनिधी)  येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था वर्धापनदिनाचे औचित्य साधून सात दिवसीय नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिराचे केलेले आयोजन हे विद्यार्थ्यांच्या नाट्य कला गुणांना वाव देणारे आहे. हे नाट्य प्रशिक्षण शिबिर विद्यार्थ्यांना स्वतः चा शोध घेण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. असे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्य लेखक, अभिनेते, संस्थेचे माजी विद्यार्थी धनंजय सरदेशपांडे ( पुणे ) यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले. नूतन विद्यालयाच्या पतपेढी भवन सभागृहात दिनांक १२ ते १८ जून दरम्यान होणाऱ्या नाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन धनंजय सरदेशपांडे यांच्या हस्ते गुरुवार ( दि. १२ ) रोजी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया हे होते.

तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, नाट्य प्रशिक्षक ज्येष्ठ रंगकर्मी शरद कुलकर्णी ( छत्रपती संभाजी नगर ) यांची उपस्थिती होती. आपल्या उद्घाटनपर भाषणात धनंजय सरदेशपांडे पुढे म्हणाले की, ” सेलूच्या नाट्य चळवळीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे. ही भावना खुप दिवसांपासून मनात होती. नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून ती पूर्ण होते आहे. शिबिरात सहभागी बाल कलाकारांच्या माध्यमातून सेलूतून भविष्यात नक्कीच मोठे नाट्य कलावंत घडतील. ” . हा विश्वासही त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिरात नूतन विद्यालय व नूतन कन्या प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गातील तीस विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. ते म्हणाले की, ” नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर हा आरंभ बिंदू असून या पुढे सेलूतील नाट्य चळवळीला गती मिळेल.” सुत्रसंचलन शिल्पा बरडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अनिल कुलकर्णी यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन शशिकांत देशपांडे यांनी केले. नाट्य शिबिर यशस्वीतेसाठी रवी मुळावेकर, भालचंद्र गांजापुरकर, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, नागेश देशमुख, सच्चिदानंद डाखोरे, मिरा शेटे, सरस्वती शेरे, अरूण रामपुरकर परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!