आपला जिल्हा

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी परभणी जिल्‍हयात २३ जानेवारी पासून सर्वेक्षण सुरु

सर्वेक्षण कामी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

परभणी, दि. २० (प्रतिनिधी ) मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्‍यासाठी मा. राज्‍य मागासवर्ग आयोगाने निश्चित केलेल्‍या निकषानुसार सर्वेक्षणाचे काम युध्‍द पातळीवर पुर्ण करणे बाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या सर्वेक्षणाच्‍या कामासाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी व महानगर पालीका हद्दीत आयुक्‍त महानगर पालीका यांना नोडल अधिकारी म्‍हणून प्राधिकृत करण्‍यात आले आहे. गोखले इन्‍स्‍टीटयुट, पुणे या संस्‍थेकडून सर्वेक्षण कामकाजाचे सॉफ्टवेअर तयार करण्‍यात आले असून राज्‍य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्‍या प्रश्‍नावलीतील माहिती मोबाईलव्‍दारे गावपातळीवर नियुक्‍त केलेले प्रगणक यांच्‍याकडून भरण्‍यात येणार आहे. या कामी परभणी जिल्‍हयात ग्रामीण भाग व नगर पालीका क्षेत्राकरीता 3141 प्रगणक व 204 पर्यवेक्षक यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. महानगर पालीका क्षेत्रासाठी 705 प्रगणक व 47 पर्यवेक्षक यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. पर्यवेक्षक व प्रगणक यांना प्रशिक्षण देण्‍यासाठी परभणी जिल्‍हात 14 मास्‍टर ट्रेनर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी यांना सहाय्य करण्‍यासाठी निवासी उपजिल्‍हाधिकारी हे सहाय्यक नोडल अधिकारी आहेत. तसेच तालुकास्‍तरावर तहसिलदार नोडल अधिकारी असून नायब तहसिलदार हे सहाय्यक नोडल अधिकारी आहेत.

या अनुषंगाने आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी, मास्‍टर ट्रेनर व तालुकास्‍तरीय सब ट्रेनर यांचे प्रशिक्षण राज्‍य मागासवर्ग आयोगाकडून आलेल्‍या मास्‍टर ट्रेनर यांच्‍या मार्गदर्शनातून जिल्‍हाधिकारी यांच्‍या उपस्थितीत जिल्‍हाधिकारी कार्यालयात संपन्‍न झाले. तसेच दिनांक 21 व 22 जानेवारी रोजी प्रत्‍येक तालुक्‍यात प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण घेण्‍यात येणार आहे. गाव पातळीवर प्रत्‍यक्ष सर्वेक्षणाच्‍या कामास 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. प्रत्‍येक प्रगणकाकडून 100 कुंटूबाना भेट देवून प्रत्‍येक घराचे सर्वेक्षण करण्‍यात येणार असून सर्वेक्षण झालेल्‍या घरावर मार्कर पेनव्‍दारे चिन्‍हांकन करण्‍यात येणार आहे. सदर सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत केले जाणार असून या अंतर्गत प्रत्‍येक कूंटूबास भेट देणार आहे. तरी प्रत्‍येक कुंटूबातील एका सदस्‍यानी घरी थांबून सर्वेक्षण करणारे प्रगणक यांना आपल्‍या कूंटूबाची अचूक माहिती देण्‍याबाबत आवाहन करण्‍यात येत आहे.
तसेच कुणबी जातीच्‍या नोंदी शोधणे कामी सर्व विभागाना लेखी सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत, ज्‍या गावातील अभिलेखे तपासणी शिल्‍लक राहीले असेल त्‍या गावात पुन्‍हा अभिलेख पडताळणी मोहिम राबविण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. यापुर्वी शोधलेल्‍या कुणबी जातीच्‍या नोंदीची यादी जिल्‍हा संकेतस्‍थळावर तसेच संबंधित गावात प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे. याशिवाय कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरण करण्‍यासाठी अर्ज स्‍वीकृती व दाखले वितरण यासाठी विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे. याचा लाभ घेण्‍याचे, तसेच परभणी जिल्‍हयात दिनांक 23 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी, 2024 या दरम्‍यान होणा-या सर्वेक्षणकामी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन परभणीचे जिल्‍हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!