सेलू ( प्रतिनिधी ) स्वच्छता पंधरवड्या निमित्त आयोजित ग्रामसभेत सिंगठाळा ता.सेलू येथील तरुणांनीलो कसहभागातून सार्वजनिक शौचालय निर्मितीचा संकल्प केला आहे.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त (ता.२ ) रविवार रोजी आयोजित पालकसभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे हे उपस्थित होते.यावेळी त्यांनी गावातील तरुण एकत्र आले,तर गावाचा विकास कशा पद्धतीने होऊ शकतो.हे विविध उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट केले. त्यासोबतच त्यांनी नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान करायचा असेल तर नवयुवक तरुणांनी नवरात्र उत्सवानिमित्त माता भगिनींसाठी लोकसहभागातून सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तरुणांनी लोकसहभाग जमा करत दसऱ्याच्या दिवशी सार्वजनिक शौचालय निर्मितीचा संकल्प केला आहे.यावेळी शरद ठाकर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच गजानन वाघमारे व शरद ठाकर यांनीही आपली सहयोग राशी तरुणांकडे सुपूर्द केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदास गोरे हे होते,तर प्रमुख उपस्थितीत शरद ठाकर हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पिंपळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर इघारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल गोरे,अरुण गोरे,सतीश शिंगाडे,सतीश गोरे,सचिन गोरे यांनी परिश्रम घेतले.यावेळी गावातील तरुण युवक,महिला भगिनी व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.