सेलू (प्रतिनिधी) :“आपल्या काळ्या सुपीक जमिनीला आणि जीवनदायिनी गोदावरी, दुधना, करपरा, पूर्णा नद्यांच्या पाण्याला जगभर मान्यता आहे. तरीही शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी का राहते?”
असा हृदयाला भिडणारा प्रश्न मिशन प्राणाचे प्रमुख ध्रुव साकोरे यांनी उपस्थित करत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवला.
पारंपरिक कापूस–सोयाबीन शेतीत मेहनत जास्त, तर नफा कमी मिळतो. यामुळे तरुण वर्ग शेतीकडे पाठ फिरवत आहे. अशा संकटाच्या काळात मिशन प्राणा ग्लोबर्क सोल्युशन अॅग्रो रेंजर्स यांच्या माध्यमातून मिश्र फळबाग हा शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम पर्याय आहे.
आजच्या शेतकऱ्याचा संघर्ष उद्याच्या पिढीचे भविष्य घडवेल. मिश्र फळबाग ही केवळ शेतीतील नवी क्रांती नाही, तर ग्रामीण भारताच्या समृद्धीचे बीज असल्याचे साकोरे यांनी सांगितले. पुढे बोलताना म्हणाले की , प्रत्येक शेतात आंबा, पेरू, शिकू, मोसंबी अशा ४–५ फळझाडांची मिश्र फळबाग लावल्यास एका पिकावर अवलंबून राहावे लागणार नाही. नैसर्गिक आपत्ती आल्यासही शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल.
कार्बन शोषणामुळे वैज्ञानिक प्रमाणपत्रीकरण मिळेल. राष्ट्रीय बाजारपेठेत फळांना विक्री मिळून शेतकऱ्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढेल.
या उपक्रमातील सर्व खर्च सी.एस.आर. फंडिंग व शासकीय योजनांतून उचलला जाणार असून शेतकऱ्यांना अत्यल्प खर्चात नवा मार्ग उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सेलू तालुका कृषी विभाग, मिशन प्राणा व बोर्डीकर कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. पावसाचे अडथळे असूनही शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय जवान, जय किसान, जय विज्ञान या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषवाक्याला प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य मिशन प्राणा करीत असून, हा उपक्रम शेतीला नवा श्वास, तरुणांना नवी आशा आणि देशाला नवा मार्ग दाखवणारा ठरेल, असा विश्वास या वेळी ध्रुव साकोरे यांनी केला…!