आपला जिल्हा
जीवनाच्या प्रवाहात पोहायला शिकविणारे शिक्षण हवे – डॉ. अभय बंग
श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमालेस श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) प्रत्येक विद्यार्थ्यात एक मूर्ती आधीच विद्यमान आहे. शिक्षक व शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांना आत्मभान द्यावे. आजच्या काळात शिक्षणाचा भार आणि तणाव वाढतो आहे. बेरोजगारीचे प्रमाणही वाढते आहे. श्रमाप्रती उदासीन तरुणाई आपल्या आसपास दिसते. शिक्षणाचा जीवनाशी संबंध उरला नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा देण्यासाठी जीवनाच्या प्रवाहात पोहायला शिकवणारे शिक्षण हवे आहे. जीवन उपयोगी शिक्षणच विद्यार्थ्यांचा उद्धार करते. प्रत्यक्ष काम करणारा समाज निर्माण व्हावा. जीवनातील कर्तव्य पुर्तीतून विद्यार्थी शिकत असतो. विद्यार्थ्यांना कृतिशील बनविणारे शिक्षण हवे आहे.’ असे प्रतिपादन पद्मश्री, महाराष्ट्रभूषण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत डॉ. अभय बंग यांनी केले.
नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू संचालित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे सुवर्ण महोत्सवी पुष्प श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात शनिवार ( दि. २३ ) रोजी लक्ष्मीबाई लालजी रामजी कन्या प्रशालेच्या सभागृहात संपन्न झाले. ‘ वेगळे शिक्षण शक्य आहे का ? ‘ या विषयावर व्याख्याते डॉ. अभय बंग यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया हे होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात पुढे बोलताना डॉ. अभय बंग म्हणाले की, ‘ पुस्तकी शिक्षणासोबतच जीवनातील जबाबदारीची जाणीव देणारे शिक्षण महत्त्वाचे असते. विद्यार्थी हा सर्वांगीण दृष्ट्या शिकला पाहिजे. शिक्षणातून विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावेत. जीवन हेच शिक्षण आहे. विद्यार्थ्यांना जीवनाचा हेतू कळला पाहिजे. प्रत्यक्ष कृती आचरणात आणणारे शिक्षक असायला हवेत. जीवनातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी केवळ शाळेत नाही तर जीवन जगतानाच आपण शिकत असतो. ‘ असेही डॉ. अभय बंग म्हणाले. सिध्दी सुवर्णकार या विद्यार्थिनीने रेखाटलेले चित्र डॉ. अभय बंग यांना भेट देण्यात आले. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन व्याख्यानमालेचे सहसंयोजक प्रा. सुभाष बिरादार यांनी केले. तर आभार अशोक लिंबेकर यांनी मानले. व्याख्यानास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डि.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, माजी विद्यार्थी तथा माजी आमदार मोहनराव सोळंके, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे, तसेच परभणी, जिंतूर, मानवत, माजलगाव, मंठा, परतूर, सेलूतील संस्थाचालक, शिक्षक, डॉक्टर, प्राध्यापक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
माजी विद्यार्थ्यांचा कार्यसन्मान
या वेळी संस्थेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यामध्ये जिल्हा उत्कृष्ट पुरस्कारप्राप्त उद्योजक महेश व वसुधा खारकर, रामेश्वर व किरण राठी, पंडित पलुस्कर पुरस्कारप्राप्त गायक यशवंत व सुरेखा चारठाणकर आणि मुद्रा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त मुद्रक सतीश व ज्योती कुलकर्णी यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन डॉ.अभय बंग यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी केले.