सेलू ( प्रतिनिधी) सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील हॉ. मुन्ना वाईन बार याला मिळालेला परवाना दहा वर्षापूर्वी च्या बनावट कागदपत्रांच्या आधारे देण्यात आला असून, या विरोधात ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी २८ मे रोजी महिलांसह जिंतूर-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
देवगाव ग्रामपंचायत प्रशासन,ग्रामस्थ ,महिला मंडळ यांच्या वतीने १३ मे रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, राज्य उत्पादन अधिक्षक यांचे जिल्हास्तरीय समीतीला देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की,देवगावफाटा येथील हि बार सार्वजनिक वर्दळीच्या रस्त्यावर, शिवाजी चौकाजवळ व विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयांच्या मार्गावर असल्यामुळे महिलांची, विद्यार्थ्यांची व प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत आहे,याशिवाय ग्रामपंचायतचे नाहरकत नसताना दिलेला बार परवाना रद्द करावा अशी मागणी १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र कारवाई न झाल्याने २८ एप्रिल रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.दरम्यान राज्य उत्पादन जनमाहिती अधिकारी यांनी बाबुअप्पा साळेगावकर यांना प्रस्तावातील २०१४ – १५ मधील बांधकाम करणे परवाना,बांधकाम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, गावठाण प्रमाणपत्र, लोकसंख्या प्रमाणपत्र व २०२३ ची कर पावती अशी कागदपत्रे दिली. २९ एप्रिल रोजी रामेश्वर बहिरठ यांनी ग्रामसेवकांकडे या कागदपत्रांची अधिकृत नक्कल प्रत मागितली.ग्रामसेवकांनी ६ मे रोजी दिलेल्या उत्तरात बांधकाम परवाना,बांधकाम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, गावठाण प्रमाणपत्र, लोकसंख्या प्रमाणपत्र अशी कोणतीही कागदपत्रे ग्रामपंचायतीच्या अभिलेखात नाहीत असे उत्तर दिले.६ जुन २०२३ ची कर पावती सत्यप्रत दिली पण हि पावती विना क्रमांकाची असल्याने ती पण बनावट असल्याचा संशय बळावला आहे.एकंदरीत मिळालेला बारचा परवाना हा बनावट कागदपत्रांच्या आधारे आहे हा गंभीर प्रकार पुढे आला.जिल्हास्तरीय समीतीने हा परवाना रद्द करण्याची कारवाई केली नाही तर २८ मे रोजी देवगावफाटा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल,यास प्रशासन जबाबदार असेल असेही नमुद केले आहे.या निवेदनावर सरपंच जिजाबाई सोन्ने,उपसरपंच चंद्रकला सातपुते, सदस्य गुंफाबाई चव्हाण, राधा साळेगावकर, भगवानराव सातपुते,बाबुअप्पा साळेगावकर,रामेश्वर बहिरठ,गोविंद मोरे,मोकिंदराव मोरे,सखाराम चव्हाण,लक्ष्मण सोन्ने, राजेभाऊ पवार, राधाकिसन कपील मोरे यांचेसह ग्रामस्थ व महिलांच्या सह्या आहेत.