आपला जिल्हा
सतारवादक मेहताबअलींच्या वादनाने समारोहाची सांगता

सेलू दि.३०(प्रतिनिधी)-भेंडीबजार घराण्याचे युवाकलावंत उस्ताद विलायतखान यांच्या परंपरेतील सतारवादक मेहताबअली नियाजी यांच्या वादनाने येथील हरिभाऊ चारठाणकर संगीत समारोहाची सांगता झाली.

धारवाड येथील पं. कैवल्यकुमार गुरव सारख्या दिग्गज कलावंताच्या सादरीकरण पश्चात युवा कलावंताचे सादरीकरण हे एका अर्थाने त्या कलावंतासाठीचे आव्हानच होते.मेहताबने ते यशस्वीपणे पेलून शिखरमैफलीने संगीतसमारोहाची सांगता केली हे विशेष.
राग बागेश्रीने त्यांनी सतार वादनास सुरूवात केली.त्यांनी सादर केलेल्या पंजाबी धूनला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तबलावादक स्वप्निल भीसे सोबत त्यांची जुगलबंदी मैफलीची उत्कटता वाढविणारी होती.
लव्हेकरांचा लडिवाळ यमन!
संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर स्मृती संगीत समारोहाच्या दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरूवात प्रा.कृष्णराज लव्हेकर यांच्या गायनाने झाली. त्यांच्या बहुश्रृत अशा ‘ यमन’ रागाच्या लडिवाळ प्रस्तुतीकरणाने रसिक सुखावले.निसर्गदत्त प्रतिभा,आवाजातील फिरत, दमदार आलापी, अल्पस्वल्प प्रमाणात परंतू कल्पकतेने केलेला सरगमचा वापर, बहेलावे,तान क्रियेमुळे तासाभराच्या सादरीकरणात प्रवाहीपणं होतं. त्यांना साथसंगत करणारे डॉ. प्रशांत जोशी सावरगांवकर(तबला) शांतीभुषण चारठाणकर (हार्मोनियम) यांच्या पूरक साथसंगतीमुळे मैफलीस रंग चढत गेला.




