आपला जिल्हा

नूतन कन्या प्रशालेच्या परिसरात रमल्या माजी विद्यार्थिनी ….. वर्ग मैत्रिणींसह गप्पागोष्टी, खेळातून जागवल्या आठवणी

सेलू  ( प्रतिनिधी ) येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थीनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पहिल्या दिवशी शनिवारी ( दि. २८ ) माजी विद्यार्थीनी शाळेत दाखल झाल्या. शालेय परिसर, आपल्याला शिकवत असलेले शिक्षक, वर्ग मैत्रिणींना पाहून एकाच वेळी माजी विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर, डोळ्यात नकळत पाणीही तराळले. शाळेच्या प्रवेशद्वारावर आजी विद्यार्थीनींनी माजी विद्यार्थीनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

नूतन कन्या प्रशालेच्या १९७४ ते २०१५ या वर्षातील दहावीच्या बॅचच्या हैदराबाद, करिमनगर, मेहकर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, परतूर, नाशिक, वाशिम, नांदेड, बार्शीसह राज्यभरातून आलेल्या जवळपास ७६२ माजी विद्यार्थीनींची नोंदणी पहिल्या दिवशी झाली. माजी विद्यार्थीनींनी उत्साहात प्रार्थना, राष्ट्रगीत म्हटले. आपण शिकत असलेल्या वर्गात जाऊन वर्ग मैत्रिणींसह गप्पागोष्टी करत जुन्या आठवणी ताज्या केल्या. संगीत खुर्ची, गोळाफेक, थालीफेक, शंभर मीटर धावणे, कबड्डी, तीन पाय दौड या खेळात आपले वय आणि पद विसरून माजी विद्यार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. माजी विद्यार्थीनीच्या वावराने शालेय परिसरात एक चैतन्य निर्माण झाले होते.
माजी विद्यार्थिनी मेळाव्याच्या निमित्ताने १९७३ पासूनच्या विविध कार्यक्रम उपक्रमांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे तसेच स्व.दुर्गाताई कुलकर्णी स्मृती ग्रंथालयात भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विधी व कामकाज विभागाच्या महाव्यवस्थापक स्मिता बोरीकर (मुंबई) व मंत्रालय कक्ष अधिकारी रिना ठाकूर यांच्या हस्ते झाले. स्वागतासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तात्रय घोगरे यांची उपस्थिती होती.

उद्या उद्घाटन, विविध कार्यक्रम

रविवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. नऊ वाजता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर व प्रा.डॉ.इच्छा शिंदे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन आहे.
त्यानंतर ‘आम्ही कशा घडलो’ या विषयावर आजी विद्यार्थिनींशी सुसंवाद व मार्गदर्शन, तर ‘माझी शाळेविषयी कल्पना (सुधारणा, योजना) या विषयावर विद्यार्थिनी विचार मांडणार आहे. दुपारी दोन वाजता मुक्तचिंतन, मनोगत व समारोप आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!